Goodwill India
Goodwill India is a Non-Profit NGO which collects then Washes, Alters, Irons and then distributes use We further distribute them to needy people.
You can donate used clothes, utensils, and other reusable household items to us .
15/09/2026
मुथूट फायनान्स व गुडविल इंडियातर्फे विद्यार्थ्यांना वह्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिवणे आणि माध्यमिक विद्यालय, उत्तमनगर येथील 300 गरजू विद्यार्थी- विद्यार्थिनींना 3000 वह्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षस्थानी मुथूट फायनान्स चे रिजनल मॅनेजर नि. लेफ्टनंट कर्नल श्री सचिन घोरपडे, गुडविलचे विश्वस्त श्री कालिदास मोरे, श्री शेखर मोरे, सौ संपदा अलाटे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार ऍडव्होकेट श्री मोहनराव देशमुख, किरण सातपुते आणि स्वप्नील माळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना श्री सचिन घोरपडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दलामध्ये भरती होण्याचे आवाहन केले तसेच मुथूट फायनान्सच्या कार्याबद्दल माहिती दिली. तर कालिदास मोरे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती अलका पिंगळे मॅडम यांनी प्रास्ताविक सादर करताना विद्यालयाच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा सादर केला. तर मुख्याध्यापक खोपडे सरांनी विद्यार्थ्यांना मदत केल्याबद्दल आभार मानले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र गोलांडे सर व आभार प्रदर्शन वैशाली जाधव मॅडम यांनी केले.
10/09/2026
गुडविल क्लाउड किचनचे खासदार मेधाताईंच्या हस्ते उदघाटन
पुणे, ६ सप्टेंबर २०२६,
गुडविल इंडिया महिला बचत गट या सेवाभावी संस्थेत काम करणाऱ्या सर्व महिला या अन्नपूर्णा आहेत असे उदगार क्लाउड किचनच्या उदघाटन प्रसंगी खा. मेधाताई कुलकर्णी यांनी काढले. जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, कामगार, निरनिराळे आश्रम, शाळा आणि सर्वसामान्य पुणेकरांसाठी त्या दररोज अतिशय स्वच्छतेत व प्रेमाने स्वयंपाक बनवित असल्याने त्यांना या नागरिकांचे नक्कीच आशिर्वाद मिळत असतील असे प्रतिपादन शिक्षकदिनी राज्यसभा खासदार डाॅ मेधा कुलकर्णी यांनी या उदघाटन प्रसंगी केले.
शिक्षक दिनाचे दिवशी गुडविलच्या शिवणे येथील आधुनिक केंद्रीय स्वयंपाकघराचे ( क्लाउड किचनचे) उदघाटन खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळेस त्या बोलत होत्या. या विशेष कार्यक्रमाला व्यावसायिक विश्राम कुलकर्णी, नगरसेविका धनश्री कोल्हे, माजी नगरसेवक जयंत भावे, रोहिदासदादा मोरे, कालिदास मोरे उद्योजक दत्ताभाऊ कोल्हे, सौ संपदा अलाटे, रणजित मोरे, राम जोगदंड, स्वप्नशिल्प सोसायटीचे विवेक विप्रदास, अरविंद लेले, आशिष खैरे, मधुसूदन पारखी, सुनील नखाते, प्रसाद घारे,सौ.रजनी मोरे, शेखर मोरे,अनिश मोरे, ऋतुजा मोरे आणि गुडविल इंडियाचे टीम उपस्थित होती.
यावेळेस खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते कु.निकिता कुंभार रा. शिवणे या गरजू मुलींस लग्नानिमित्त भांड्यांचा संसार भेट देण्यात आला.
खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या मी जेव्हा जेव्हा गुडविलमध्ये येते तेव्हा संस्थेस नवीन आयाम जोडले जात असतात. गुडविल मधील महिलावर्ग ही मातृशक्ती आहे. त्या दररोज हजारामध्ये पुणेकरांना प्रेमाने जेवू घालतात. त्यामध्ये अनेक वृद्ध, विद्यार्थां, कामगार यांचा समावेश असतो. या मुलांच्या आयांचे आशिर्वाद त्यांना नक्कीच मिळतील. गुडविलच्या या कामासाठी माझ्या खासदार फंडातून एखादे वाहन देता येईल का याचा मी नक्कीच विचार करीन.
गरजू विद्यार्थिनींकडून 'गुडविल इंडिया'च्या जेवणाची प्रशंसा
समाजातील गरजू व वंचित घटकांसाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या 'गुडविल इंडिया' या सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण वस्तुपाठ स्वरूपात मांडले आहे. गेली १ महिना 'गुडविल इंडिया'तर्फे एस.एन.डी.टी. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमधील ५० गरजू व गरीब विद्यार्थिनींना दररोज एका वेळेचे मोफत आणि पौष्टिक जेवण पुरवले जात आहे.
महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अनेक दूरवरच्या व गरजू विद्यार्थिनींना रोजच्या भोजनाची चिंता भासत होती. ही गरज ओळखून 'अनंत डिफेन्स सिस्टीम्स प्रा लि'ने पुढाकार घेतला आणि या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमांतर्गत ' गुडविल इंडिया'तर्फे मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा अत्यंत उत्तम असून, अन्न स्वच्छ, ताजे आणि चवदार असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थिनींनी दिल्या आहेत.
उपक्रमाबद्दल बोलताना विद्यार्थिनींनी सांगितले की, "गुडविल इंडियामुळे आमची रोजच्या एका वेळच्या जेवणाची काळजी मिटली आहे. जेवणाचा दर्जा खूप छान आहे आणि यामुळे आम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अधिक सोपे झाले आहे."
यावेळी अनंत डिफेन्स सिस्टिम्सचे चेतन धारिया, ऋचा जोशी, संस्थेचे अध्यक्ष कालिदास मोरे, संपदा अलाटे, व महाविद्यालयातील शिक्षक वर्ग उपस्थित होते. शिक्षण घेणाऱ्या गरजू मुलींना असाच पाठिंबा मिळत राहिल्यास त्यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
20/08/2026
गुडविलचे कर्वेनगर येथे कपडे वाटप केंद्र सुरू
गुडविल इंडियाच्या वतीने कर्वेनगर वनदेवी समोर, अल्पदरात कपडे वाटप केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्राचे उदघाटन स्थानिक नगरसेविका सौ. मंजुषा खर्डेकर आणि श्री संदीप खर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुडविल इंडियाचे प्रमुख कालिदास मोरे, विश्वस्त संपदा अलाटे, व्यावसायिक शिरीष भुजबळ, उत्तमनगर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष सारंग राडकर, विवेक विप्रदास, प्रशांत व्यास, ॲडव्होकेट आशिष खैरे, मुक्त पत्रकार प्रसाद घारे आणि गुडविलचा स्टाफ उपस्थित होता.
गुडविल इंडियाचे पुण्यातील हे नववे केंद्र असून या सर्व केंद्रांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला, पुरुष, लहान मुले, तरुण विद्यार्थी, विद्यार्थिंनी यांना अतिशय चांगले, स्वच्छ, नको असलेले कपडे अल्पदरात उपलब्ध करुन देण्यात येतात. यावेळी नगरसेविका सौ. खर्डेकर आणि श्री. खर्डेकर यांनी गुडविलच्या या कपडे वाटप केंद्रास शुभेच्छा दिल्या.
17/08/2026
15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्यदिन गुडविल इंडियात अत्यंत उत्साहात साजरा
15 ऑगस्ट भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिनी गुडविल इंडिया टीमने अत्यंत उत्साहात साजरा केला. हा स्वातंत्र्य दिवस म्हणजे गुडविल इंडियाचा 14 वा व मोरे पेट्रोलियमचा 19 वा वर्धापनदिन असल्याने या दिवसाला गुडविल टीमच्या दृष्टीने वेगळे महत्व असते. या 2026 वर्षामध्ये गुडविलच्या कोल्हेवाडी, खडकवासला, कर्वेनगर व गणेशनगर अशा एकूण चार नवीन आउटलेट सुरू करण्यात आल्या. यामुळे कपडे वाटप व जेवण याच्या एकूण 13 आउटलेट कार्यरत झाल्या आहेत याचा सर्वांना मनापासून आनंद होत आहे. याशिवाय लवकरच गूडविलचे सेंट्रलाइज किचन, मल्टीपर्पज हॉल व ऑफिस लवकरच सुरू होत आहे. आपल्या सर्वांच्या खंबीर पाठिंबामुळेच ही प्रगती आम्हाला शक्य झाली आहे. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.👏
12/08/2026
कर्वे नगर येथील गुडविल इंडियाच्या 'गुडविल थाळीला' विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्तम प्रतिसाद.
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 'गुडविल इंडिया' या स्वयंसेवी संस्थेच्या महिला कर्मचाऱ्यांमार्फत चालवण्यात येणाऱ्या गुडविल थाळीची सुरुवात कर्वेनगर येथील शाहू कॉलनी, लेन नं 11 येथे करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरण तसेच महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत त्यांना आत्मनिर्भर बनवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
गुडविल थाळी सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली असून, कर्वे नगर आणि आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हे एक वरदान ठरत आहे. दररोजच्या धावपळीत विद्यार्थ्यांना अगदी परवडणाऱ्या दरात घरगुती, ताजे आणि पौष्टिक जेवण येथे उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
येथील स्वच्छ,सकस व पौष्टिक जेवणाचा लाभ सर्व नागरिक व विद्यार्थ्यांनी घ्यावा.
05/08/2026
"एसएनडीटी" कॉलेज मधील गरजू विद्यार्थिंनींना दररोज मोफत पौष्टिक जेवण देण्यासाठी तीन संस्था एकत्र
पुण्यातील एसएनडीटी कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील ५० गरजू विद्यार्थिंनींना दररोज मोफत पौष्टिक जेवण देण्यासाठी अनंत डिफेन्स सिस्टीम्स प्रा.लि., गुडविल इंडिया आणि एसएनडीटी या तीन संस्था एकत्र आल्या आहेत. शनिवार दिनांक १ ऑगस्ट रोजी या बाबत झालेल्या एका सामंजस्य करारावर अनंत डिफेन्स सिस्टीम्सचे प्रमुख चेतन धारिया, गुडविल इंडियाचे प्रमुख कालिदास मोरे आणि एसएनडीटी च्या वतीने प्राचार्य डाॅ भरत व्हनकटे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
या करारानुसार आज पासून पुढील वर्षभर ५० विद्यार्थिंनींना दुपारचे भोजन मोफत देण्यात येणार आहे. या भोजनाची आर्थिक जबाबदारी अनंत डिफेन्स सिस्टीम्स या कंपनीने घेतली असून गुडविल इंडिया ही सामाजिक संस्था पौष्टिक जेवण उपलब्ध करुन देणार आहे.
याप्रसंगी अनंत डिफेन्स सिस्टीम्सच्या तर्फे संचालक गिरीश बुटाला, संचालिका लिना धारिया, दिशा धारिया, रूचा जोशी गुडविल इंडियाच्या वतीने विश्वस्त संपदा अलाटे, अनिश मोरे, रजनी मोरे, विवेक विप्रदास आणि प्रसाद घारे तसेच एसएनडीटी तर्फे उप प्राचार्य डाॅ अंजली कदम, डाॅ मृणालिनी घाटगे, डाॅ प्राजक्ता भडगांवकर उपस्थित होत्या.
चेतन धारिया म्हणाले, आज या निमित्त तीन संस्थांचा त्रिवेणी संगम झाला आहे. भविष्यात अन्य शैक्षणिक संस्थात उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न राहिल. गुडविल इंडियाचे कालिदास मोरे म्हणाले, अन्नदानाच्या आवश्यक कामासाठी तीन संस्था एकत्र येऊन गरजू मुलींना पौष्टिक आहार देणार ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. डाॅ व्हनकटे म्हणाले, या उपक्रमातून विद्यार्थिंनींचे आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होईल. रोजच्या जेवणाची काळजी मिटल्याने त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येईल. एसएनडीटी च्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
31/07/2026
गुडविल इंडियामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
गुडविल इंडियामध्ये गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या आणि आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी गुडविल इंडियाचे संस्थापक श्री. कालिदास मोरे सर यांना कर्मचाऱ्यांकडून गुरुपौर्णिमेच्या भावूक आणि हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. शून्यातून गगनभरारी घेणारा मोरे सरांचा प्रवास सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असून, त्यांनी केवळ संस्था उभी केली नाही तर एक भक्कम 'गुडविल परिवार' घडवला आहे, अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. काम करताना नेहमी पाठीशी उभे राहून मार्गदर्शन करणाऱ्या सरांप्रती सर्वांनी सत्कार व आदर व्यक्त केला.
या कार्यक्रमाला श्री. द्वारका मित्तल, श्री. बाळासाहेब गांजवे, श्री. परशुराम अग्रवाल, श्री. दिलीप जाधव, सौ. अलाटे मॅडम यांच्यासह समस्त गुडविल परिवार उपस्थित होता. याप्रसंगी मित्तल ग्रुपचे श्री. द्वारकाशेठ मित्तल यांनी गुडविल इंडियाला पुस्तकांची भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
27/07/2026
एसएनडीटी कॉलेज, गुडविल आणि अनंत डिफेन्स प्रा. ली.एकत्र काम करणार
शिक्षण क्षेत्रातील 'एसएनडीटी'कॉलेज, सामाजिक क्षेत्रातील गुडविल इंडिया आणि उद्योग क्षेत्रातील अनंत डिफेन्स सिस्टीम या तीन मोठ्या संस्था नजिकच्या भविष्यात 'फुड स्कॉलरशिप' (गरजू विद्यार्थ्यांना अल्पदरात पौष्टिक जेवण) या विषयावर एकत्र काम करणार आहेत असे या तिन्ही संस्थांच्या प्रमुखांनी आज येथे सांगितले.
'फुड स्कॉलरशिप' च्या माध्यमातून लवकरच प्रारंभी 'एसएनडीटी' मधील पन्नास मुलींना दररोज सकाळी एकवेळचे अल्पदरात पौष्टिक जेवण उपलब्ध करून देण्याची योजना कार्यरत करणार आहे.
या संदर्भात गुडविल इंडियाच्या कार्यालयात आज झालेल्या एकत्र कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली. या वेळी 'एसएनडीटी' चे प्राचार्य भरत व्हनकटे, अनंत डिफेन्स सिस्टीमचे श्री चेतन धारिया, गिरीश बुटाला व गुडविलचे कालिदास मोरे, सौ.संपदा अलाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच उपप्राचार्य डाॅ अंजली कदम, डाॅ मृणालिनी घाटगे, डाॅ प्राजक्ता भडगांवकर, अनंत डिफेन्स सिस्टीम प्रा.ली चे गिरीश बुटाला आणि ऋचा जोशी यांनी गुडविल इंडियाला भेट देऊन उपक्रमांची माहिती घेतली.
श्री. कालिदास मोरे यांनी प्रास्ताविक भाषण केले तर मुक्त पत्रकार प्रसाद घारे यांनी आभार मानले.
24/07/2026
गुडविलचे कोल्हेवाडीत कपडे वाटप केंद्र सुरू
गुडविल इंडियाच्या वतीने खडकवासला येथील कोल्हेवाडी येथे अल्पदरात कपडे वाटप केंद्राचे उदघाटन नगरसेविका सौ. धनश्रीताई कोल्हे व श्री दत्ताभाऊ कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुडविल इंडियाचे कालिदास मोरे, संपदा अलाटे, मुक्त पत्रकार प्रसाद घारे, सीए श्री शैलेंद्र मते व सोहम कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
गुडविल इंडियाचे पुण्यातील हे आठवे केंद्र असून या शाखांच्या माध्यमातून महिला, पुरुष, लहान मुले, तरुण विद्यार्थी, विद्यार्थिंनी यांना अतिशय चांगले, स्वच्छ वापरलेले कपडे अल्पदरात उपलब्ध करुन देण्यात येतात. यावेळी श्री व सौ कोल्हे यांनी या कपडे वाटप केंद्रास शुभेच्छा दिल्या.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
More Petrol Pump, NDA Road, Shivane , Uttamnagar
Pune
411023
Opening Hours
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Friday | 10am - 6pm |
| Sunday | 10am - 6pm |
Alerts
Be the first to know and let us send you an email when Goodwill India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.