Green Birds Initiative
As nature lovers, we work for nature protection and conservation on a personal level and by forming subject-wise groups of like-minded people.
07/06/2026
लोकाग्रहास्तव परत परत त्याच तळ्याकाठी सजग भटकंती!
५ जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रीन बर्ड्स अभियानातर्फे आज ७ जूनच्या रविवारी सकाळी लकाकि तळे येथे बॉटनी तज्ज्ञ, अभ्यासक आणि निसर्गप्रेमींसमवेत लकाकि तळ्याकाठी सजग भ्रमंती केली.
चालता चालता वाटेत येणाऱ्या प्रत्येक वनस्पती, पक्षी यांची ओळख करून घेत भ्रमण मंडळ आगेकूच करत होते. हा सजग भ्रमंतीचा अनुभव कायमच आनंददायी, सुखदायी व ज्ञानात भर घालणारा असतो.
निसर्गाच्या सान्निध्यात कंटाळा या शब्दाला कधी स्थान नसतेच मुळी! कंटाळलेल्या मनाला ताजेतवाने करण्यासाठी निसर्गात भटकंती हा उत्तम पर्याय आहे. मात्र ती भटकंती डोळसपणे केलेली असावी.
#तळ्याकाठीसजगभ्रमंती
#जागतिकपर्यावरणदिन२०२६
#ग्रीनबर्ड्सअभियान
#हरितपृथ्वीसुंदरपृथ्वी
04/06/2026
पावसाळ्यात बिया किंवा बीज गोळे उधळते वेळी, वृक्षलागवड करते वेळी कोणती काळजी घ्यावी?
सर्वप्रथम, बिया किंवा बीज गोळे आपण कोणत्या जागी उधळणार आहोत ती जागा कुठल्या अधिवासात मोडते हे लक्षात घ्यावे. मग त्या अधिवासास सुसंगत अशा प्रकारच्या वृक्षांच्या बिया किंवा बीज गोळे तिथे उधळावेत.
समजा, अधिवास कोणता आहे हे ठरवता येत नसेल तर बिया किंवा बीज गोळे जिकडेतिकडे उधळण्यापेक्षा वनस्पती तज्ज्ञांकडे त्या बिया किंवा बीज गोळे सुपूर्त करावेत. रोपे करून बघायला आवडत असतील तर त्या बियांची रोपे तयार करून ठेवावीत. मग यथावकाश ती रोपे लागवड करण्याएवढी मोठी झाल्यावर वनस्पती तज्ज्ञांकडे देता येतात.
वनस्पतींच्या रोपांची लागवड करते वेळी देखील अधिवास लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. कारण अधिवासानुसार योग्य प्रकारच्या वनस्पती लागवडीसाठी निवडणे हेच खरे जाणते वृक्षारोपण ठरते. उदाहरणार्थ, माळरान ही एक विशिष्ट परिसंस्था आहे. माळ उजाड वाटला म्हणून त्यावर नेवर, सुकाणू सारख्या कोस्टल प्रदेशातील वनस्पती लावणे साफ चुकीचे आहे. माळावर बोरीबाभळी सारख्या मूळ अधिवासाला साजेशा वनस्पतींची लागवड करणे आवश्यक आहे.
तसेच महत्त्वाचे म्हणजे लागवड करताना चिंच, गोरखचिंच, पेरू अशा गुणी विदेशी वृक्ष प्रजातीचा एखाद दुसरा अपवाद वगळता आपल्या मातीतील देशी वृक्षांना प्राधान्य द्यावे. देशी आणि विदेशी वृक्ष यामधील भेद कळण्यासाठी वनस्पती तज्ज्ञांची मदत घ्यावी.
©ग्रीन बर्ड्स अभियान
चित्र सौजन्य : आंतरजाल
#जाणतेवृक्षारोपणकरा
#ग्रीनबर्ड्सअभियान
#हरितपृथ्वीसुंदरपृथ्वी
03/06/2026
पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो
हृदयावरची विचाराची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते !
- कवी अनिल
२० मे जागतिक मधमाशी दिन आणि २२ मे विश्व जैवविविधता दिन या औचित्याने मॉडेल कॉलनी लेक जैवविविधता उद्यान अर्थात् लकाकि तळे येथे रविवार ३१ मे रोजी ग्रीन बर्ड्स अभियानातर्फे गार्डन वॉक आयोजित केला होता.
याप्रसंगी लेक पार्कचे वैशिष्ट, तेथील देशी व विदेशी वनस्पती, तळ्यातील आणि काठावरील प्राणी व पक्षी या निसर्गसंपदेची माहिती दिली.
हा वॉक घेत असताना पेंटेड स्टॉर्क, स्पॉटबिल्स, कूट, कॉर्मोरंट, डार्टर असे विविध वैशिष्ट्यपूर्ण पाणपक्षी दिसले. कासवे, खारी अशा प्राण्यांनी दर्शन दिले. शिवाय, फुलपाखरू व मधमाश्यांचे फुलांमधून मधुरसपान करत असताना रम्य दर्शन घडले.
या गार्डन वॉकमध्ये निसर्गप्रेमी, बॉटनी तज्ज्ञ, बॉटनी अभ्यासक अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते.
©प्रिया फुलंब्रीकर
फोटो सौजन्य : प्रिया, स्नेहल, शोभना, विलीना
#जागतिकमधमाशीदिन२०२६
#विश्वजैवविविधतादिन२०२६
#ग्रीनबर्ड्सअभियान
#हरितपृथ्वीसुंदरपृथ्वी
24/05/2026
कविवर्य ग. ह. पाटील यांच्या सुंदर बालकवितांचा मागोवा घेत घेत मन भूतकाळात शिरले आणि बालपणी एका सुरात शाळेत म्हणायचो ती निर्मळ आणि सहज भावातील त्यांची 'देव' ही एक सुंदर बालकविता भेटली.
देव
देवा तुझे किती सुंदर आकाश |
सुंदर प्रकाश सूर्य देतो ||
सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर |
चांदणे सुंदर पडे त्याचे ||
सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे |
किती गोड बरे गाणे गाती ||
सुंदर वेलींची सुंदर ही फुले |
तशी आम्ही मुले देवा तुझी ||
इतुके सुंदर जग तुझे जर |
किती तू सुंदर असशील ||
©सर्व फोटो प्रिया फुलंब्रीकर
10/05/2026
बालपणी 'फुलपाखरू छान किती दिसते', 'माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो!', 'देवा तुझे किती सुंदर आकाश' या ख्यातनाम कविवर्य व शिक्षण तज्ज्ञ ग. ह. पाटील यांच्या निर्व्याज बालकवितांनी मनात घर केले होते आणि आज त्यांच्या नावाचा राज्यस्तरीय पुरस्कार 'एकदा काय झाली गंमत!' या माझ्या पहिल्या बालकविता संग्रहाला मिळाला आहे. हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे मनःपूर्वक आभार!
या कविता संग्रहातील बऱ्याच बालकविता ह्या निसर्ग संवर्धनाचा संदेश देणाऱ्या आहेत म्हणून या पुस्तकास वनस्पतीतज्ज्ञ प्रा. श्रीधर महाजन सरांनी प्रस्तावना लिहिली आहे. 🙏🪷🌿
#एकदाकायझालीगंमत
#अखिलभारतीयमराठीबालकुमारसाहित्यसंस्था
#हरितपृथ्वीसुंदरपृथ्वी
05/05/2026
एका तळ्याकाठी सजग भटकंती....
५ मे ची रविवार सकाळ आम्ही निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन मॉडेल कॉलनी तळ्याकाठी (लकाकि तळे) साजरी केली.
ग्रीन बर्ड्स अभियानाने प्रजाती विविधता अभ्यासता यावी म्हणून ही तळे भेट आयोजित केली होती. आयोजक व मार्गदर्शक म्हणून मी हे पुण्यातील मध्य वस्तीतील जैवविविधता उद्यान निवडले.
यावेळी तळ्याकाठच्या वनस्पती, तळ्यातील व काठावरील पक्षी आणि प्राणी जीवन न्याहाळत या नैसर्गिक पाणथळ परिसंस्थेचा सर्वांनी मनमुराद आस्वाद घेतला. शिवाय, काही ग्रीन वॉरियर्सने या भेटीत सहभागी होऊन हे तळे उद्यान घडवतानाच्या रोचक सत्यकथा कथन केल्या.
जैवविविधतेचे संगोपन केले नाही तर निसर्गात असमतोल निर्माण होऊन निसर्गाचा ऱ्हास उद्भवतो. निसर्गात संतुलन राखण्यासाठी जैवविविधतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
हरित जीवनशैलीचा अंगीकार करण्याकरता पाणथळ परिसंस्थेची ही भेट प्रचंड महत्त्वाची ठरली.
©प्रिया फुलंब्रीकर
#नैसर्गिकसरोवर
#पाणथळपरिसंस्था
#हरितपृथ्वीसुंदरपृथ्वी
01/05/2026
Beauty of Reuse and Recycling
Every year before holi, I get busy collecting natural materials like flowers, leaves, fruits, seeds of different plants to prepare natural holi colours for holi, dhulivandan and rangpanchami. And I reuse and recycle the natural holi colours that remain with me after the festivities are over. I usually reuse the left over colours during summer workshops for kids. Also, this year I reused the natural liquid colours as sherbet and reused the natural dry colours to colour the rangoli.
Additionally, some natural liquid colour made of Bixa plant remained with me and I reused that orange bixa colour in my orange fruit bio enzyme. It has given double benefits as both bixa and orange are rich in vitamin C. Now, this bio enzyme has become fully medicinal and pleasantly orange in colour. Once this bio enzyme becomes ready to use, I'll use it as a plant fertilizer.
Cheers!
Photo of Orange Bixa Bio enzyme
11/04/2026
वनराईच्या नवीन अंकात 'निसर्गस्नेही होळी अन् रंगपंचमी!' हा माझा लेख प्रकाशित झाला आहे.
होळी, धुलिवंदन व रंगपंचमी या दिवशी नैसर्गिक रंग वापरूनच सण साजरा केला पाहिजे. तसेच होळी देखील निसर्गपूरक पद्धतीनेच पेटवली पाहिजे. याविषयी या लेखात सविस्तर लिहिले आहे.
हा लेख व मार्च २०२६चा पूर्ण अंक वाचण्यासाठी वनराई मासिक अवश्य विकत घ्यावे.
#वनराई
#निसर्गस्नेहीहोळीआणिरंगपंचमी
#निसर्गपूरकसणआणिउत्सव
#स्वच्छसुंदरवाहतीजीवितनदी
#माझीनदीमाझीजबाबदारी
#हरितपृथ्वीसुंदरपृथ्वी
09/04/2026
सर्वांना नमस्कार!
अलीकडे मोबाईलचे व्यसन मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांना देखील लागलेले दिसून येते. लहान मुलांना लागलेले मोबाईल फोनचे व्यसन सोडवण्यासाठी 'आर्यनची गोष्ट' या बालकथेमधून काही उपाय सुचवले आहेत.
ही गेल्या वर्षी दिवाळी अंकामध्ये छापून आलेली गोष्ट आज ब्लॉग रूपातून आपल्या भेटीस आणली आहे.
स्नेहांकिता,
प्रिया फुलंब्रीकर
#आर्यनचीगोष्ट
आर्यनची गोष्ट *************** *************** *************** अलीकडे मोबाईलचे व्यसन मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांना देखील लागलेले दिसून येते. विशेषतः क...
Click here to claim your Sponsored Listing.
Website
Address
Sadashiv Peth
Pune