Career Disha

Career Disha

Share

Behavioural development, Aptitude & Psychometric testing, Teachers training, Career guidance and Career awareness in schools, teachers and parents.

07/09/2023

*स्पर्धेत धावण्यापूर्वी*
क्लास कोणासाठी,कशासाठी?

*डाॅ श्रीराम गीत*
(9960674094)
स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यासमोर फक्त राज्यसेवा किंवा केंद्रीयसेवा स्पर्धा परीक्षाच उभ्या रहातात. वास्तविक पाहता चार किंवा पाच प्रकारच्या परीक्षा याच प्रकारात मोडतात. बँकेत नोकरी साठी कारकून किंवा अधिकारी पातळीवरच्या दोन वेगवेगळ्या परीक्षा असतात. सर्व प्रकारच्या गणवेशधारी दलांसाठी असाच थोडाफार सामायिक अभ्यास असलेल्या परीक्षा असतात. एवढेच काय मॅनेजमेंटच्या प्रवेशाची कोणत्याही पातळीवरील तयारी करताना जी परीक्षा द्यावी लागते त्यातही वरील अभ्यासक्रमाशी साम्य असते.
कोणतीही पदवी झाल्यानंतर यातील कोणतीही परीक्षा आपल्या इच्छेनुसार देता येते, हे त्यातील एक विशेष. मात्र पदवीधर झाल्यानंतर लगेच यासाठीचा क्लास कोणता लावू ?हा प्रश्न विचारणारे 99 टक्के विद्यार्थी सापडतात. क्लास शिवाय यश नाही हे इतके मनात ठसलेले असते की आपण कशाकरता क्लास लावत आहोत हा प्रश्नही विद्यार्थी व त्यांचे पालकांना पडत नाही. या साऱ्या परीक्षांसाठीची सामान्य प्रश्नपत्रिका कोणी जर सहज पाहिली तर त्यात दहावीचे गणितावर आधारित एक विभाग असतो. दुसरा विभाग पदवी समकक्ष इंग्रजीतून विचारलेल्या भाषेवरच्या प्रश्नांचा असतो. तर तिसरा विभाग हा मुख्यतः विद्यार्थ्यांची तर्क विचारक्षमता तपासण्यासाठी असतो.याचेच एकत्रिकरण करून राज्यसेवा किंवा केंद्र सेवा स्पर्धा परीक्षांसाठी सी-सॅट नावाचा पेपर द्यावा लागतो.
*क्लास लावावा का न लावावा*?

या चर्चेत मी येथे जात नाही. मात्र बारावी पासून दर रविवारी जे विद्यार्थी या तीन पद्धतीच्या प्रश्नांवर आधारित प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करतात, त्यांना या साऱ्या परीक्षेत यश नक्की मिळते. या उलट पदवीनंतर क्लास लावून व त्यासाठी मोठी रक्कम मोजून हाती यश लागत नाही. काहींचे बाबतीत तर हे मला जमणे शक्य नाही म्हणून भीतीपोटी तो रस्ता सोडून देण्याची वेळ येते. ग्रामीण विद्यार्थी अनेकदा मी आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे, पेपर वाचन सुरू केले आहे, निबंध लेखनाचा सराव करीत आहे अशी चुकीची व ठाम समजूत करून घेतात. शास्त्र शाखेतून इंजीनियरिंग ला जाणारे विद्यार्थी सोडले तर इतर साऱ्यांचाच दहावी नंतर गणिताशी संबंध येत नसतो. एवढेच काय तर्क विचारात्मक कोडी सोडवण्याचा खेळ सुद्धा त्यांनी कधी केलेला नसतो. त्यामुळे या दोन मोठ्या विभागामध्ये किमान मार्क मिळवण्यात ते अपयशी ठरतात किंवा त्या विभागांची त्यांच्या मनात कायमची भीती बसते. कितीही उत्तम अशा स्वरूपाचा क्लास जरी लावला तरी तिथल्या शिकवण्याच्या वेगाशी जुळवून घेणे हे सुद्धा कठीण असते. अशीच काहीशी गोष्ट सामान्य ज्ञान या विषयाची असते. आयुष्यात कधीही पेपर न वाचलेला पदवीधर जेव्हा या स्पर्धा परीक्षांच्या मागे जाऊन पुस्तके वाचायला लागतो तेव्हा त्याला या साऱ्याबद्दल अनाकलनीय वाटणारे साधे साधे सामान्य ज्ञान पाठांतर करून लक्षात ठेवावे लागते. मग स्वाभाविकच अभ्यासाचे दडपण येते.
अनेकांना क्लासची फी भरणे हे सुद्धा आर्थिक दृष्ट्या डोईजड असते. यावर साधासा उपाय म्हणजे या आधी सांगितलेला दर रविवारचा एक तासाचा अभ्यास. मराठीत एक म्हण आहे. तहान लागल्यावर विहीर खांदायला घेणे. तसेच पदवीधर झाल्यावर क्लासची जाहिरात पाहून नाव नोंदणी करणारे करतात.
*हा ज्याचा त्याचा प्रश्नय*

परीक्षेचे तंत्र समजून घेण्याकरता, स्पर्धेची किमान तयारी स्वतः केल्यानंतर, सामान्य ज्ञान वाचनातून वाढवल्यानंतर क्लास लावणे कितपत गरजेचे आहे? हा ज्याचा त्याचा प्रश्न. हा प्रश्नच ज्या विद्यार्थ्यांना व पालकांना पडत नाही त्यांच्यासाठी क्लास हा प्रकार प्रत्येक पेठेत, प्रत्येक गावात होता, आहे आणि राहिल.
------------------------------
लोकसत्ता करिअर वृत्तांत.
-------------------------------

14/03/2023

*करिअर कसे निवडावे?*

मूल जन्माला आल्यापासून पालकांनी मुलांचे आयुष्य पुढे भविष्यात तो कोण होणार? या प्रश्ना समोर घुटमळत राहते आणि त्याची उत्तरे वयानुरूप बदलत राहतात म्हणजे एखाद मूल आकाशाकडे बघत म्हणते मी वैमानिक होणार, थोडे मोठे झाल्यावर म्हणते मी डॉक्टर होणार अजून थोडे मोठे झाल्यावर म्हणते मी खेळाडू होणार तर काही पालक स्वतः आपल्या पाल्याचे करियर ठरवून मोकळे होतात अशा सगळ्या अनिश्चिततेच्या वातावरणात एक गोष्ट प्रामुख्याने आपण विसरतो ती म्हणजे मुलांची आवड, क्षमता, कल, व्यक्तिमत्व, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यात असलेली नैसर्गिक प्रतिभा यापैकी कुठलेच पैलू लक्षात न घेता करीअर ठरवणे म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखे आहे!!

भारतीय पालक करिअर निवडताना 3P मध्ये जास्त अडकलेली मला दिसतात हे 3P म्हणजे परदेस, पॅकेज, आणि पोझिशन. परंतु या 3P मध्ये न अडकता आवड, अनुभव व कामातील आनंद या तीन शब्दावरून वर लक्ष केंद्रित केल्यास हळूहळू का होईना प्रथम पॅकेजचा लाभ मिळणे शक्य होते, पोझिशन यथावकाश हमखास मिळतेच, कामाच्या गरजेनुसार कदाचित परदेशवारी सुद्धा करू शकते. मुळात कोण व्हायचे? यापेक्षा मला ते का व्हायचे? प्रश्नातून उत्तरे सापडत जातात,हे मुलांना समजावणे अधिक महत्त्वाचे आहे.

काही सुशिक्षित पालक ज्यांचे आपल्या पाल्यावर बारकाईने लक्ष असते किंवा जे मुलांचा गृहपाठ नियमितपणे घेत असतात त्यांना आपल्या पाल्याची विषया निहाय शैक्षणिक गुणवत्ता माहीत असते जसे की आमच्या पिंकी ला सायन्स मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतात म्हणून आम्ही तिला डॉक्टर बनवणार आहोत किंवा आमचा मोठा मुलगा कौस्तुभ गणितात खूप हुशार आहे तर तो इंजिनिअरिंग करेल अशी वरचेवर फक्त एकाच विषयानुसार करियर निवडून मोकळे होतात पण तसं करिअर निवडणे इतकं सोपं असतं का? म्हणजे बघा डॉक्टर होण्यासाठी सायन्स मधील बायोलॉजी या विषयाची आवड असणे ही फक्त आपल्या अभ्यासापुरती ठीक आहे पण एक यशस्वी डॉक्टर होण्याकरता आपल्या पाल्याची सेवाभावी वृत्ती आहे का? किंवा आपला पाल्य कुठल्याही परिस्थितीत मनाचा समतोल राखण्याची वृत्ती किंवा लोकांमध्ये मिसळायला त्याला जमते का? यावर अधिक विचार करून निर्णय घ्यायला हवा तर इंजिनिअरिंग म्हणजे नवनिर्मिती तर आपला पाल्य नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो का? किंवा स्वतःला परिपूर्ण ठेवण्यासाठी धडपडत असतो का? किंवा त्याला कुठल्याही समस्येवर स्वतःच्या कल्पकतेतून उत्तरे शोधता येतात का? अशा प्रश्नांची उत्तरे जर सकारात्मक असतील तरच इंजिनीरिंग साठी विचार व्हायला हवा.

आपला स्वभाव आणि करिअर यांचे एकमेकांशी अतूट नाते असते ज्या क्षेत्रात करिअर यशस्वी घडवायचे आहे त्यासाठी आपल्याला आपल्या स्वभावाची योग्य जाणीव असायला हवी असे बरेच अनुभव मला रोज येत असतात. मंगेश नावाचा चोवीस वर्षांचा युवक एकदा माझ्याकडे कौन्सलिंगसाठी आला होता मंगेश लहानपणापासून अभ्यासू व्यक्तिमत्व.. शाळेतून पहिला येणारा म्हणून एका प्रतिष्ठित कॉलेज मधून इंजिनिअर झाला नंतर लगेच एमबीए करून एका नामांकित कंपनीच्या मार्केटिंग डिपार्टमेंट चा हेड म्हणून रुजू झाला पण मग पहिल्या सहा महिन्यातच त्याला आपल्या जॉब चा कंटाळा यायला लागला म्हणून माझ्याकडे सल्ला घ्यायला आला. मंगेश मधील नैसर्गिक गुणवत्ता तपासल्यानंतर माझ्या लक्षात आले की मुळात मंगेशा मितभाषी म्हणजे कमी बोलणारा ज्याला मानसशास्त्राच्या भाषेत Introvert/अंतर्मुखी असं व्यक्तिमत्व म्हणजे अशा लोकांना स्वतःबरोबर वेळ घालवणे अधिक पसंत असते ,अंतर्मुखी लोक गरजेपुरताच लोकांमध्ये मिसळायला आवडते परंतु त्याच्या कामानिमित्त रोज नवीन लोकांना भेटणे, आपल्या कल्पना त्यांना पटवून देणे,आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित करणे असा त्याचा नित्यक्रम होता पण मंगेशचा मूळ स्वभाव याच्या अगदी विरुद्ध असल्याने भरघोस पगार असून सुद्धा त्याला त्याचा जॉब नकोसा वाटायला लागला, हा आणि असे कितीतरी मंगेश आपल्या आजूबाजूला असतात. शिक्षण घेतले एक,काम दुसऱ्याच प्रकारचे आणि मग हे तर आपल्याला आवडतच नाहीये हे समजले की सुरू होते आयुष्यभराची घुसमट! हे सगळे टाळण्यासाठी आणि योग्य
करिअर निवडण्यासाठी स्वतःची ओळख असणे नितांत गरजेचे आहे आणि आता स्वतःची ओळख जाणून घेण्यासाठी विज्ञानाने खूप प्रगती केली आहे.

एकविसावं शतक हे स्पेशलायझेशनच आणि आपण निवडलेल्या क्षेत्रात उंच उंच जाण्याच तुम्ही त्याचं क्षेत्रात उंच जाऊ शकता ज्या क्षेत्रासाठी लागणारे विशिष्ट बुद्धिमत्तेचा कॉम्बो तुमच्यात निसर्गतः आहेत आणि म्हणूनच स्वतःसाठी योग्य करिअर निवडताना आपण आपल्या विशिष्ट बुद्धिमत्तेचा कॉम्बो लक्षात घ्यायला हवा कारण प्रत्येक मेंदूच्या डिझाईन वेगळं!! प्रत्येक मेंदूची संरचना वेगवेगळे असते.*"व्यक्ती तितक्या प्रकृती*" असे आपण म्हणतो हीच संकल्पना थोडी पुढे नेली तर मग आपल्याला म्हणावे लागेल *"व्यक्ती तितक्या मेंदूच्या संरचना.*"
मेंदूच्या या वेगवेगळ्या संरचनेविषयी आणि आपल्यातील नैसर्गिक गुणवत्ता शोधण्यासाठी *डॉ. हावर्ड गार्डनर या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने बहुआयामी बुद्धिमत्तेची संकल्पना मांडलेली आहे*. गार्डनर यांनी लिहिलेल्या *"फ्रेम्स ऑफ माईंड"* या पुस्तकाची सुरूवातच *"प्रत्येक मूल स्मार्ट असतेच"* अशा वाक्याने करतात पाठोपाठ प्रत्येक मूल वेगवेगळ्या आघाड्यांवर कमी अधिक स्मार्ट असते हेही ठासून सांगतात उदा. विराट कोहली हा क्रिकेटमध्ये कितीही ग्रेट असला तरी गायला सांगितल्यावर तो काही सोनू निगम होऊ शकणार नाही किंवा सोनू निगमने फलंदाजीची कितीही रात्रंदिवस प्रॅक्टिस केली तरी तो काही विराट कोहली होऊ शकणार नाही म्हणजेच शारीरिक कौशल्यांच्या आघाडीवर कोहली स्मार्ट आहे तर सोनू निगम सांगितिक बुद्धिमत्ता किंवा संगीतात स्मार्ट आहे. एखादे ए.पी.जे. अब्दुल कलाम असतात जे शास्त्रज्ञ आहेत, वीणा सुंदर वाजवतात, भारावून टाकणारे प्रेरणादायी लिखाणही करतात,लहान पोरांची सहज संवाद साधतात, आणि त्याच वेळेस राष्ट्रपती म्हणून राजकारण यांसोबत कामही करतात ही खरी बहुआयामी प्रतिमा पण प्रत्येक मूल सगळ्याच आघाड्यांवर स्मार्ट नसतात हेच प्रत्येक आई-वडिलांनी सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे.
डॉ.हावर्ड गार्डनर यांनी बुद्धिमत्तेचे आठ वेगवेगळे पैलू मांडले आहेत आपल्याकडेही प्राचीन काळापासून अष्टपैलू सांगितलेले आहेच की!!
आपला निसर्ग इतका निष्ठुर नक्कीच नाहीये की त्यांना फक्त लता मंगेशकर ,सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, धीरूभाई अंबानी, यांनाच फक्त गुणवत्ता बहाल केल्या परंतु निसर्गाने आपल्यातील प्रत्येकाला सुद्धा वरील आठ गुणवत्ता पैकी कुठल्यातरी एका नैसर्गिक गुणवत्तेचा धनी बनवलेला आहे थोडक्यात आपल्या प्रत्येकात एक राजहंस दडलेला आहे फक्त प्रश्न आहेत तो म्हणजे ती नैसर्गिक गुणवत्ता ओळखल्या जाण्याचा ते जेवढे आपल्याला लवकरात लवकर शोधता येईल तेवढे उत्तम!!

मी अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन करत आहे मानसशास्त्रीय बुद्धिमापन कसोटी आता झपाट्याने विकसित होत आहे. डॉ.हावर्ड गार्डनर यांनी मांडलेल्या बहुआयामी बुद्धिमत्ता प्रत्यक्षात मोजता येते. प्रत्येक व्यक्ती हा विशिष्ट बौद्धिक, भावनिक, सामाजिक, शारीरिक,बुद्धिमत्तेचा कॉम्बो असतो व प्रत्येक करियरला एका विशिष्ट कॉम्बो ची गरज असते या दोन्ही गोष्टी मॅच केल्या *की झालं तुम्ही त्या क्षेत्रातील हीरो होणारच*!! परंतु बहुतांश वेळा करिअर फक्त परीक्षेतील मिळालेल्या टक्केवारीनुसार निवडण्यात येते पण नंतर मात्र त्यात करिअर करण्याची इच्छा होत नाही.

प्रत्येक विद्यार्थ/विद्यार्थिनी हुशार असतेच फक्त ती हुशारी नेमकी कोणत्या क्षेत्रात आहे? याचा शोध घेऊन व विद्यार्थ्यांची नैसर्गिक उपजत-गुणवत्ता,कौशल्य कॅपॅसिटी,व्यक्तिमत्व,आवड यानुसार करिअर निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य वेळी, योग्य पद्धतीने व योग्य मार्गदर्शन किंवा दिशा न मिळाल्यामुळे आयुष्यात फरपट झालेले अनेक लोक माझ्या पाहण्यात आहेत. नशीबाने जे घडेल ते सर्व दैवावर हवाला ठेवून स्वीकारत राहतात. क्षमता,पात्रता, कर्तृत्व,चिकाटी, श्रद्धा असून सुद्धा योग्य वेळी, योग्य पर्याय अथवा मार्ग न निवडल्यामुळे जीवन ढकलत असतात त्यातील काही अपघाताने यशस्वी होतातही परंतु बहुतेक जण वैफल्य आणि असमाधान यामुळे आयुष्यभर ग्रासलेले असतात

_*एक मोड गलत मुडा में राहे सफर मे*_
_*और तमाम उम्र मंजिल मुझे तलाशती रह गई*_
असे म्हणण्याची वेळ कुणावरही येऊ नये यासाठी ज्याप्रमाणे आपण वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी डॉक्टर कडेच जातो किंवा कायदेविषयक सल्ला घेण्यासाठी वकिलाकडे जातो तसेच एखादी इमारत बांधण्यासाठी आर्किटेक चा सल्ला घेत असतो तसेच स्वतःचे करिअर घडवायचे असेल तर आपले नातेवाईक काय म्हणतायेत?किंवा माझे मित्र मैत्रिणी कुठल्या साईडला जात आहेत? असल्या फुटकळ गोष्टींचा विचार न करता एखाद्या अनुभवी करिअर कौन्सिलर चा सल्ला घेणे आयुष्यभर लाभदायी ठरते!!

28/02/2023

*डॉ. श्रीराम गीत*

*अपारंपारिक शिकायला*
*परदेशात शिकायचय*
(क्रमांक चार)
परदेशाचे आकर्षण, तिकडे शिकायला जाण्याचे विविध रस्ते व त्यातील स्पर्धा याविषयी गेल्या तीन मंगळवारी आपण माहिती घेतली. आज अपारंपारिक अभ्यासक्रम करून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परदेशात शिकण्याच्या स्पर्धेबद्दल जाणून घेऊ यात.
ट्रॅव्हल टुरिझम, हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, स्पोर्ट्स मॅनेजमेंट, डिझाईन, ॲनिमेशन, डिजिटल मीडिया,मास कम्युनिकेशन, फिल्म मेकिंग अँड एडिटिंग अशा विविध क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासासाठी अतिशय चांगल्या स्वरूपाचे कोर्सेस परदेशात उपलब्ध आहेत. यातील काही युरोपमध्ये आहेत,काही ऑस्ट्रेलियात आहेत. मात्र भारतात पदवी घेतल्यावर दोन ते तीन वर्षाचा अनुभव असला तर या अभ्यासक्रमांसाठी जास्त फायदा होतो. एवढेच नव्हे तर जगातील विविध देशांची दारे त्यातून उघडू शकतात.
वर उल्लेख केलेल्या कोणत्याही कोर्ससाठी 80 टक्के मार्क पाहिजेत,गणित उत्तम पाहिजे, शास्त्र आलेच पाहिजे अशा स्वरूपाची गरज नसते. थोडक्यात 60 ते 75 टक्के या दरम्यानचे मार्कांचे सातत्य राखणारा पण त्या त्या विषयामध्ये खूप रस असणारा एखादा विद्यार्थी यशस्वी होतो. पालकांनी त्याला प्रोत्साहन दिले, मदत केली तर ही मुले जगाच्या पाठीवर विविध देशात उत्तम स्वरूपाची कामे करतात.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन ते तीन वर्षाचा कामाचा अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांसाठी प्राधान्यही मिळते. ज्या देशात हा कोर्स करायला जायचे आहे तेथील भाषा व्यवहारापुरती बोलता आली तरी पुरते. ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडा या देशांकरता आयईएलटीएस ही परीक्षा किमान मार्काने उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. इंग्लंडमध्ये हेच अभ्यासक्रम अतिशय महाग आहेत. शिवाय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तेथे नोकरीची शाश्वती नाही.
खर्चाचे आकडे अभ्यासक्रमाच्या कालावधीनुसार बदलत जातात. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहे ,का पदव्युत्तर पदवी आहे यावर ते ठरते. अशा केलेल्या अभ्यासक्रमांच्या जोडीला विविध कौशल्यांची जोड देणारे छोटे छोटे अभ्यासक्रम पूर्ण करणारे काही विद्यार्थी सापडतात. अशांना काम मिळण्याची कधीच अडचण राहत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर मास कम्युनिकेशन पूर्ण करून ॲनिमेशनचा छोटा कोर्स केलेला विद्यार्थी. थोडक्यात म्हणजे परदेशात काहीही करून जायचं आहे याचेसाठी अभ्यासातील हुशारीच लागते असे नाही.
सर्विस इंडस्ट्री मधील विमानतळावरील विविध स्वरूपाची कामे करणारे, फ्लाईट पर्सर, एअर होस्टेस, पायलट, मर्चंट नेव्ही, कस्टम मॅनेजमेंट, एअर ट्रॅफिक कंट्रोलर या पद्धतीच्या कामातील मंडळींना थेट परदेशी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. मात्र किमान पाच ते सहा वर्षाचा अनुभव त्यासाठी उपयुक्त राहतो.
अभ्यास करणारे हुषार किंवा अभ्यास न करणारे कौशल्य संपादन केलेले आणि कष्टाळू यांना परदेशी जाण्यासाठीच्या स्पर्धेला कसकसे तोंड द्यावे लागते हे समजून घेतले तर रस्ता जरूर सापडतो.
- -------------×---------------
*करिअर कौन्सेलर*:9960674094

22/02/2023

*डॉ. श्रीराम गीत*

*एम.एस.साठी*
*परदेशात शिकायचय*
(क्रमांक तीन)

परदेशी शिक्षण चांगलं असतं,ते गुणवत्ता पूर्ण असतं,नवीन तंत्रज्ञान आणि अद्यावत माहिती यांचा संगम परदेशातील शिक्षणात मिळतो, तेथील विद्यापीठांचा दर्जा उत्तम असतो हे आपले सामान्य ज्ञान. याला पूरक अशी- स्पर्धेत धावण्यापूर्वी- मार्कांच्या आकड्यांची माहिती पाहूयात.
सर्वांचा लाडका, जगभरातील बहुतेकांचे आकर्षण असलेला देश म्हणजे अमेरिका. कोणतेही पदव्युत्तर शिक्षण तेथे घ्यायचे असेल तर ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन म्हणजेच जीआरई ही परीक्षा द्यावी लागते. अमेरिकेतला जन्म, अमेरिकेतली पदवी असली तरी सुद्धा ही परीक्षा द्यावी लागते. थोडक्यात या परीक्षेनंतर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांची आकलन क्षमता आणि गणिती समज या दोन्हीचा अंदाज या परीक्षेतून घेतला जातो. यातील गुणानुसार प्रवेश मिळतो.परदेशातून आलेल्या प्रत्येक पदवीधर विद्यार्थ्याला हिच्या जोडीला टोफेल म्हणजे टेस्ट ऑफ इंग्लिश अॅज फॉरेन लँग्वेज ही परीक्षा किमान मार्काने उत्तीर्ण व्हावे लागते. अमेरिकन विद्यापीठात शिकवले जाणारे इंग्रजी माध्यमातील विषय समजण्यासाठी हा निकष लावतात. अमेरिका सोडून अन्य इंग्रजी भाषिक देशांमध्ये आयईएलटीएस ही परीक्षा घेतली जाते.
किमान 290 ते जास्तीतजास्त 340 अशा मार्कांच्या गुणवत्तेनुसार विविध विद्यापीठातील प्रवेशाची सुरुवात होते. पदवीनंतरचा कामाचा अनुभव, पदवी दरम्यान केलेले अन्य सामाजिक काम, एखाद्या कलेतील गुणवत्ता पूर्ण प्रशिक्षण या साऱ्याचा जीआरईच्या मार्काचे जोडीला पूरक म्हणून उपयोग होतो.
अजून दोन गोष्टींना तिथे महत्व दिले जाते. एसओपी म्हणजे तुमचा येथे शिक्षणासाठी येण्याचा उद्देश स्टेटमेंट ऑफ पर्पज या नावाखाली तुम्हाला मांडायचा असतो. तुम्हाला शिकवायला असलेल्या एखाद्या प्राध्यापकाचे रेकमेंडेशन लेटर हेही महत्त्वाचे ठरते.
*शिकवणी*
केजी पासून क्लास लावण्याची भारतीय पद्धत असल्यामुळे यातील प्रत्येक गोष्टीसाठी क्लास सारख्या एखाद्या पूरक एजन्सीची मदत भारतीय विद्यार्थी घेतात हे आता अमेरिकन विद्यापीठातील सर्वांना माहीत असलेले उघड गुपित झाले आहे. इतकेच काय शिक्षणाचा उद्देश किंवा रेकमेंडेशन लेटर हे सुद्धा विद्यार्थी स्वतः न बनवता बनवून घेतात. अमेरिकेतील लीग विद्यापीठे या नावाने ओळखली जाणारी पहिली वीस विद्यापीठे अशा शिकवणी बहाद्दरांना सरसकट नाकारतात. अशा विद्यापीठात प्रवेश हवा असेल तर किमान 330 इतका जीआरईचा स्कोअर लागतो. खरे तर या पातळीला पोहोचू शकणारे भारतात सुद्धा तितक्याच उत्तम संस्थेत सहज प्रवेश मिळवू शकतात. गंमतीची गोष्ट म्हणजे अशा भारतातील सर्वोत्तम संस्थांमध्ये कॅम्पस सिलेक्शन साठी जगातील सर्वच नामवंत कंपन्या किमान गेली दहा वर्षे स्वतःहून येत आहेत. एवढेच नव्हे तर तिथे दोन वर्ष प्रशिक्षण व काम केल्यावर जगभरात त्यांच्याच शाखांमध्ये कामासाठी पाठवले जाते. अमेरिकेत पदवीधर पदवी घेतल्यावर ज्या कंपन्यांत नोकरी मिळाल्याचे कौतुकाने व मानाने सांगितले जाते त्या साऱ्या कंपन्यांची इनक्युबेशन म्हणजेच संशोधन केंद्रे बंगलोर ,चेन्नई, गुरूग्राम येथे आहेत.हे सामान्य ज्ञान सहसा विद्यार्थी,पालकात सापडत नाही.
*देशांतरासाठी शिक्षण*

हा एक वेगळाच विषय आहे. एक पदव्युत्तर पदवी घेऊन तिथे नोकरी मिळवणे व नंतर स्थायिक होऊन ग्रीन कार्ड किंवा नागरिकत्व मिळवणे यासाठी अमेरिकेतील सर्व अन्य विद्यापीठांची दारे अक्षरशः सताड उघडी आहेत.अशा विद्यापीठात शिकणारे जगभरातून आलेले सत्तर टक्के विद्यार्थी परदेशी असतात. त्यांनी दिलेल्या फीवरच ती चालतात.परदेशी विद्यार्थी मिळवणे याचे जोरदार मार्केटिंग ती करतात.इंग्लंड व आयर्लंड येथील अनेक विद्यापीठानी भारतीय शहरात प्रदर्शने मांडणे हा आता नित्यनियम झाला आहे.
गेल्या वर्षात भारतीय विद्यार्थ्यांनी केवळ अमेरिकेतील विद्यापीठांना भरलेल्या फीचा आकडा फक्त 42 अब्ज डॉलर इतका आहे. तेथील दर्जेदार विद्यापीठात उत्कृष्ट शिक्षण घेणाऱ्यांचे यामध्ये शून्य योगदान असते.कारण त्यांना जवळपास सगळी फी माफी मिळते.
स्पर्धा ही जगात सर्वच देशात असते याचे हे बोलके उदाहरण.
-------------×------------
*करिअर कौन्सेलर*:9960674094

18/02/2023

*डॉ. श्रीराम गीत*.
(9960674094)
*चांगली पदवी घ्यायला*
*परदेशात शिकायचय*
(क्रमांक दोन)

बारावीनंतर परदेशात शिकायला जाणाऱ्या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मानसिकतेबद्दल आपण मागील लेखात माहिती घेतली. अमेरिकेत कोणत्याही पदवीकरता जायचे असेल तर एसएटी ही प्रवेश परीक्षा देणे गरजेचे असते हे मागच्या लेखातच स्पष्ट केले आहे. या परीक्षेमध्ये 1600 पैकी किमान 900 गुण मिळवणे गरजेचे असते. चांगले मार्क तेराशे, तर उत्तम चौदाशे पन्नास समजले जातात. या मार्कांवर अवलंबून बऱ्या वाईट कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो.
स्पर्धेला टाळण्यासाठी ही एसएटीची परीक्षाच टाळणारे अनेक विद्यार्थी अन्य देशांचा पर्याय शोधायला सुरुवात करतात. त्यामध्ये फक्त इंग्रजीवर अवलंबून असलेली आयईएलटीएस परीक्षा गरजे इतक्या मार्काने पास होऊन प्रवेश देणारे अनेक देश आहेत. ऑस्ट्रेलिया कॅनडा न्यूझीलंड आयर्लंड इंग्लंड सिंगापूर यांचा त्या समावेश होतो. पदवी शिक्षणाच्या खर्चामध्ये फारसा फरक पडला नाही तरी प्रवेशाची सुलभता खूपच बदलते. अडचणीचा भाग एकच राहतो तो म्हणजे या देशात स्थायिक व्हायला विद्यार्थी फारसे उत्सुक नसतात. तसेच इंग्लंड व आयर्लंड सारखे देश तुम्हाला नोकरी देण्यास अजिबात उत्सुक वा तयार नसतात.मिळणारी फी घ्यायला, शिकायला स्वागत केले जाते.नोकरीसाठी नाही.
*फसवणूक*
कॅनडा सारख्या देशांमध्ये नामधारी शैक्षणिक संस्थांकडून आणि एजंटांकडून फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करण्यापर्यंत अनेक प्रकार गेल्या दोन-तीन वर्षात घडले आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची चीन व युक्रेनमधील फरपट अजूनही संपलेली नाही. हे सारे समजून घेण्याचा एकच साधा उपाय म्हणजे जिथे फक्त पैसे भरून प्रवेश मिळतो कोणत्याही प्रवेश परीक्षेला, त्यातील स्पर्धेला तोंड द्यायला लागत नाही अशा शैक्षणिक संस्था किंवा असे देश टाळलेले बरे.
एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करण्याची गरज आहे. सायन्स, इंजीनियरिंग, कॉम्प्युटर या क्षेत्रामध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे आकर्षण खूप मोठे आहे. या उलट ह्युमॅनिटी, मास कम्युनिकेशन, लायब्ररी सायन्स व म्युझियालॉजी, डिझाईन, आर्किटेक्चर या क्षेत्रात प्रगत देशामध्ये मान व मागणी दोन्ही आहे. कायदा, आंतरराष्ट्रीय संबंध, आर्बिट्रेशन, फायनान्स या विषयांमध्ये हुशार पदवीधरांची गरज व मागणी पण आहे.
*वय आणि समज*.
भारतातून पदवीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय जेमतेम 18 पूर्ण असते. वर उल्लेख केलेल्या सर्व देशातील विद्यार्थी यावेळी स्वयंपूर्णपणे, घर सोडून, पालकांची आर्थिक मदत न घेता, स्वतःचे निर्णय स्वतः घेतात.ती तिथली शंभर वर्षांची पद्धत आहे. याचा विचार आपल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी करायची गरज आहे. आपला पदवीधर विद्यार्थी कसाबसा ही जबाबदारी घेण्यासाठी सक्षम होतो. त्यामुळे पदवीवर्गातील बहुसंख्य स्थानिक विद्यार्थी स्वयंपूर्ण तर भारतातून गेलेली ही मुले पालकांच्या मनी ऑर्डर वर अवलंबून हे दृश्य सरसहा आढळते.
कोणाच्याही निकोप स्पर्धेला तोंड देण्यास हे मारकच ठरते ना?
-----------

15/02/2023

*डाॅ श्रीराम गीत*.

*बारावीनंतरच*
*परदेशात शिकायचय*
(क्रमांक एक)

परदेशात स्थायिक व्हायचय, तिकडे नोकरी करायचीय,खूप पैसे कमवून भारतात परत यायचंय ही झाली पन्नास वर्षांपूर्वीची शिळी स्वप्ने. यानंतर गेल्या तीस वर्षांमध्ये दुसरी पदवी घ्यायला तिकडे जायचंय असा बदल झाला. साध्या शब्दात म्हणजे इंजिनीयर झाला तर एम. एस. करायला तिकडे जायचे ही पद्धत रुळली. हाही प्रकार आता मागे पडून एक नवीनच फंडा सुरू झाला आहे.मुलामुलींना आता बारावीनंतरच पदवी घ्यायला तिकडे जायचं आहे.
या प्रकारामध्ये मोडणारे विद्यार्थी आता सरसकट सापडतात. हाय -फाय किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणारे यांचा यात भरणा भरपूर. अमेरिकेतच जन्माला येऊन हायस्कूलच्या वयानंतर भारतात शिक्षण झालेले अनेकजण यात मोडतात. असे सर्वच ही स्वप्ने पाहतात. तसेच भारतातील यशस्वी उद्योजक, पहिल्या पिढीचे नवश्रीमंत, छोटे मोठे राजकारणी,प्रशासक, आयटी मधील आईवडील असे डबल इंजिन असलेली कुटुंबे या गटामध्ये सरसकट सामील झाली आहेत. या साऱ्यांच्या संगतीत असणारे, नात्यात असणारे किंवा शाळेत बरोबर असणारे विद्यार्थी या दिशेला आकृष्ट झाले तर नवल ते काय?
*खर्चाचा ताळेबंद*
भारतातील कोणच्याही पदवी करता इयत्ता बारावी नंतरचा खर्च एकूण फारच क्वचित दहा लाखाच्या पुढे जातो. या उलट परदेशातील चार वर्षाच्या कोणत्याही पदवीचा खर्च याचे किमान दसपट तरी असतो.
नेमके आकड्यातून सांगायचे झाले तर येथील कोणत्याही कॉलेजची वर्षाची फी जशी 25 ते 35 हजार रुपये असते तशीच तिकडची 25 ते 35 हजार डॉलर असते.शिवाय महिना हजार डॉलर प्रमाणे चार वर्षे(पन्नास महिने) राहण्याचा खर्च येतोच येतो. हा सारा खर्च परवडणाऱ्यानी परदेशात पदवी करता जायला कोणतीही अडचण येत नाही. पण हा आकडा एक कोटी रुपये पार करतो हे वास्तव लक्षात घ्यायलाच हवे.
अमेरिकेमध्ये इयत्ता तेरावी साठी म्हणजे कोणत्याही पदवीसाठी शिकायला जायचे असेल तर स्काॅलेस्टिक एप्टिट्यूड टेस्ट (एसएटी) द्यावीच लागते. फक्त भाषा व गणित याचे आकलनावर आधारित ही टेस्ट असते. यातील मिळणाऱ्या मार्कानुसारच मिळू शकणारी संस्था किंवा कॉलेज ठरते.(विद्यापीठ पदव्युत्तर पदवीसाठी असते हे पण या मुले व पालकांना सांगावे लागते.) भारतात जसे सर्वोत्तम आयआयटी पासून सुरुवात होते आणि आडगल्लीतील छोट्या वा नवीन इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत पोहोचते तोच प्रकार तिथेही आहे. मात्र सर्वत्र खर्च सारखाच येतो.
भारतातील सर्वोत्तम संस्थेत जेईई मधून ज्यांना प्रवेश मिळू शकतो त्यांना तिकडे फी मध्ये मोठी सवलत मिळते. तशी इतरांना मिळत नाही. थोडक्यात इथल्या सर्वोत्तम संस्थेतील प्रवेशासाठी तीव्र स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवायचे का दसपट खर्च करून तिकडची सामान्य दर्जाची पदवी मिळवायची एवढाच यक्षप्रश्न मुलांसमोर उभा राहतो.इथले सारे वाईट वाटण्याची ही सुरूवात असते.

ज्या पालकांनी मुलांसाठी किमान एक कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे,त्यांच्यासाठी हा लेख नाही.स्पर्धा समजून घेण्यासाठी परदेशी वास्तव लिहिले आहे.
------------------------

Photos from Career Disha's post 14/11/2022
22/09/2022

*डॉ. श्रीराम गीत*.
(करिअर कौन्सेलर)
9960674094

कोणाही पालकाला न आवडणारा एक विचार मी आज मांडणार आहे. यामागे माझ्या कौन्सेलर म्हणून गेल्या तीस वर्षाची अनुभवाची जोड आहे हे लक्षात ठेवा आणि पुढे वाचा. आवडले नाही तर विसरून जा.प्रत्यक्षात यामध्ये बदल होण्याची शक्यता मला जरी दिसत नसली तरीही हा विषय आवर्जून मांडणे मला महत्त्वाचे वाटते. त्याचे कारण एकच आहे की ज्यातून फारसे हाती काहीच लागणार नाही अशा गोष्टी करता समाज किती पैसा व किती तास वाया घालवत असतो याची जाणीव करून देणे. हा वाचलेला पैसा व वेळ कुठे वापरायचा याबद्दल जो-तो स्वतःचा निर्णय नक्कीच घेऊ शकतो.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तुमची मुले शिकत आहेत. त्याला आता किमान 30 वर्षे झाली. अनेक शाळांनी इयत्ता आठवीनववी पासूनच एखादी परदेशी भाषा शिकवण्याला सुरुवात होऊन सुद्धा 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. हिंदी, संस्कृत ,जर्मन ,फ्रेंच यातून काय निवडायचे असे पालकांना व विद्यार्थ्यांना विचारले जाते. सर्व मोठ्या शहरातील मोठ्या शाळातून आठवी पासून जवळपास 80 टक्के मुले फ्रेंच किंवा जर्मन चा पर्याय स्वीकारतात. विचार एकच असतो एखादी परदेशी भाषा आली म्हणजे छानच. हिंदी काय समजू शकते. मराठी बोलतच असतो. केजी पासून इंग्रजीतच शिक्षण झाले आहे त्याच्यामुळे त्यात वेगळे ते काय? मोजकी मुले-मुली संस्कृत हा विषय स्कोअरिंग म्हणून घेतात एवढेच.

*अकरावीत प्रवेश घेताना*

ही सारी मुले इयत्ता दहावी पास होतात. सायन्स कॉमर्स किंवा आर्ट्स कोणतीही शाखा घेतली तरीसुद्धा अकरावी-बारावीला विषय निवडताना स्वाभाविकपणे परदेशी भाषाच ठेवली जाते. ज्यांच्या शाळातून परदेशी भाषा शिकण्याची सोय नाही ते आवर्जून अकरावी-बारावीला फ्रेंच किंवा जर्मन निवडतात. तेथेही पुन्हा तोच विचार एक परदेशी भाषा शिकलेली किती छान असते नाही का? कधीतरी उपयोगी पडेलच.
एका गमतीच्या गोष्टीचा उल्लेख मी इथे करत आहे. आठवी, नववी, दहावीत असलेली परदेशी भाषेची अभ्यासक्रमाची पुस्तके एकत्रितरित्या पुन्हा त्याच स्वरूपात अकरावी-बारावीला मुले शिकत राहतात. वर्षानुवर्षे हेच घडत आले आहे. यात काही बदल व्हावा असे ना कॉलेजला वाटते ,ना शाळेला वाटते, ना पालकांना वाटते ,ना विद्यार्थ्यांना समजते. सगळ्यांना एकच गोष्ट छान माहिती असते ती म्हणजे या विषयात खूप मार्क पडतात. पोटभर मार्क पडतात. पण हे सगळ्यांच्याच बाबतीत घडते असे मात्र नाही. ज्या मुलांना अन्य सार्‍या विषयात 80 टक्‍क्‍यांच्या पुढे मार्क असतात त्यांचे सारे छान छान चालू राहते. पण अशा मुलांची संख्या जेमतेम दहा टक्केच. मग उरलेल्या 90 टक्क्यांची अवस्था काय होते? सायन्स साठीचा क्लास व गणिताचा क्लास एकत्र.तर इंग्रजीचा क्लास आणि परदेशी भाषेचा क्लास वेगळ्याच ठिकाणी आणि शाळेची वेळ वेगळीच. अशी दररोजची त्रिस्थळी यात्रा विद्यार्थ्यांची व पालकांची सुरू होते. मुळात इंग्रजी समजता समजता ज्या विद्यार्थ्यांची दमछाक होत असते त्यांना इंग्रजीतून परदेशी भाषा शिकताना अक्षरशः धाप लागायला लागते. पण हौसेला मोल नसते ही म्हण शब्दशः खरी ठरते. कोणत्याही शहरात शास्त्र व गणिताच्या खालोखाल या परदेशी भाषांचे क्लासेस जोरदारपणे चालवण्याची अक्षरश: गल्लोगल्ली स्पर्धा चालू आहे.

*पुढे घडते काय?*

आता पाच वर्षे ही परदेशी भाषा शिकल्यानंतर या मुलांचे या भाषाशिक्षणाचे पुढे काय होते याबद्दलचा विचार. सामान्यपणे फ्रेंच वा जर्मन कितीही शिकले तरी सुद्धा त्या देशात स्थायिक व्हायला जाणाऱ्यांची, त्या देशात शिकायला जाणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया ,कॅनडा यांच्या एकत्रित केले तर जेमतेम एक टक्का. मग या पाच वर्षे शिक्षणासाठी दिलेला वेळ व पैसा याचे फलित काय? क्लास करता मोजलेली फी आपण हौसेखातर पूर्णपणे सोडून देऊ शकतो. मात्र क्लासला जाण्या-येण्यासाठी चा वेळ व प्रत्यक्ष क्लास मध्ये दिलेला वेळ हा मात्र आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच असतो. दरवर्षी किमान अडीचशे तास याप्रमाणे सुमारे एक हजार तास चार वर्षात यासाठी आपण खर्ची घालतो. या हजार तासांचा पुढच्या आयुष्याशी काहीच संबंध नसेल तर? पण हा प्रश्न ना आपल्या शाळांना पडतो ना कॉलेजला. ना विद्यार्थ्यांना पडतो वा त्यांच्या पालकांना.हा विषय इथे येत नाही कारण त्यांना भुरळ घातली जाते. महाराष्ट्रीयन असून मराठी वाचन जवळपास शून्य असलेली ही मुले परदेशी भाषा शिकण्यात मात्र आनंद मानत असतात.अशी मुले इंग्रजी बोलण्यात व संवादात कदाचित माहीर असतात मात्र हॅरी पॉटर आणि कार्टून यापलीकडे त्यांचे वाचन फारच क्वचित जाते. मुले इंग्रजीपण वाचत नाहीत हो अशी प्रेमळ तक्रार करणाऱ्या पालकांनी या साऱ्यावर जर विचार सुरू केला तर? निरर्थक अशा या हजार तासाच्या वेळातून किती तरी गोष्टी साध्य होऊ शकतात. काही नाही तर छंद, खेळ, कौशल्य विकास, यातून आयुष्याला सुंदर दिशा मिळू शकते.

खरोखरीच परदेशी भाषा शिकण्याबद्दल व त्यातून छानशी करियर करण्याचे रस्ते आहेत.त्याला चार वर्षे व सहा पातळ्याचे कठीण शिक्षण घेऊन सुरवात होते.नंतर भाषांतरकार,दुभाष्या,तांत्रिकी लेखन,टूरिस्ट गाईड यात कामे सुरू होतात.जपानी,चिनी,अरेबिक,कोरियन,स्पॅनिश अशामधे पैसा व स्कोप भरपूर.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*ज्याला इतर भाषा येत नाहीत त्याला स्वभाषा ही नीट येत नसते. त्याचा व्यत्यास हा तितकाच सत्य आहे. ज्याला स्वभाषा नीट येत नसते त्याला दुसरी कोणतीही भाषा नीट येणे कठीण असते, धड ना घरची ना नदीकाठची. असली भाषा घेऊन काय करणार*?
-------गटे.(कवी,तत्वज्ञ)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

22/04/2022

*इंजिनीअरिंगची सीईटीची परीक्षा ऑगस्टमध्ये गेली आहे*.

मे ,जून ,जुलै व ऑगस्ट असे शंभर दिवस फक्त तीन तास रोज अभ्यास करणार्‍याचा सुंदर आणि सर्वांगीण अभ्यास होणार आहे.

असा 300 तासाचा अभ्यास करण्याने कमीत कमी तीस मार्क नक्की वाढू शकतात.वीस वर्षाचे अनुभवाने सांगतोय.

तीस मार्क वाढले तर जमीन-अस्मानाचा फरक पडतो. पुण्या-मुंबईचे उत्तम इंजीनियरिंग कॉलेज मिळू शकते.
हवी ती ब्रांच पण मिळू शकते.

याउलट कंटाळा करून, झोपा काढून शंभर दिवस घालवलेत तर कुठल्या तरी कॉलेजात जाऊन कुठल्यातरी विषयातून इंजिनीयर बनणे नशिबी येईल.

उत्तम नोकरी ,छान नोकरी ,भरपूर पगार यासाठी हे शंभर दिवस महत्त्वाचे.

मुला- मुलींनो,आई-वडिलांनो जागे व्हा.
डॉ. श्रीराम गीत.
करिअर कौन्सेलर
9960674094

18/03/2022

दहावीची परीक्षा सुरू झाली आहे.शालांत परीक्षेला बसलेल्या सर्व मुलांना करिअर दिशा कडून खूप खूप शुभेच्छा👍🏼👍🏼💐💐
पुढील करिअर निवडीचा निर्णय घेण्याअगोदर थोडे थांबा.घाईने निर्णय घेऊ नका.कुठल्याही क्लास साठी लाखो रुपये फी भरण्या अगोदर आपली Aptitude Test नक्की करून घ्या आणि एक Career Guidance सत्र अवश्य घ्या. एक सेशन तुमचे कदाचित व्यर्थ जाणारे लाखो रुपये आणि त्या अनुषंगाने होणारा मानसिक त्रास यातून तुमची नक्कीच सुटका करू शकेल.

मृणाल राजहंस
संचालक
करिअर दिशा
9850880029

01/01/2022
Want your business to be the top-listed Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Pune
411021

Opening Hours

Monday 11am - 5am
Tuesday 11am - 5am
Wednesday 11am - 5am
Thursday 11am - 5am
Friday 11am - 5am
Saturday 11am - 5am