OneFlora.in

OneFlora.in

Share

https://Oneflora.in is a Platform to Observe, Differentiate, Identify and Nurture plant species.

28/09/2025

या दसऱ्याला आपटा आणि कांचन सारख्याच १० प्रजाती जाणून घेऊया...

07/09/2025

मोगऱ्या वरच्या मागच्या reel ला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलात पण comments वाचल्यावर काही नावांमध्ये चूक झाल्याचं माझ्या लक्षात आलं. आता त्या चुका सुधारून सगळ्या मोगऱ्यांच्या प्रजातींचे हे compilation आपल्यासाठी बनवलं आहे. आपल्या मित्रमंडळींमध्ये नक्की शेअर करा...

13/07/2025

पुण्यातल्या COEP च्या वर ब्रिज वरून गेली दोन वर्ष मी हे झाड observe करत होतो आणि आज त्याच्या नावाची उकल झाली.

Panical inflorescence मध्ये येणारी याची फुलं मला दोन-तीन वेळा दिसली होती पण ही फुलं आणि odd number मध्ये असलेली संयुक्त पान यांची सांगड घालणं काही जमत नव्हतं.

आज या झाडावर फळ लागलेली दिसली आणि दोन वर्षापासून pending असलेलं हे puzzle solve झालं.
तीनच्या संख्येमध्ये एकत्र असलेली फळ आणि त्यातली दोन फळांची झालेली अपूर्ण वाढ यावरून हा रिठ्याचा प्रकार असणार हे लक्षात आलं आणि इंटरनेटवर थोडा अजून सर्च केल्यावर आणि genus आणि species नक्की झाले.
तर हे झाड आहे Sapindus mukorossi, आपल्याकडच्याच रिठ्या चा, एक उत्तर भारतीय "भाऊ"..
... पुण्यातल्या लोकांनी जाता येता कधी वेळ झाला तर नक्की बघू या. संगम ब्रिजवरून flyover चढताना डाव्या बाजूला.

Gmap location: https://maps.app.goo.gl/kHSgArywjkdXUT6e7?g_st=ac

22/02/2025

"शमी" च्या शोधात - भाग ६: वनस्पती शास्त्रज्ञां मधलं महायुद्ध

आपल्यासारख्या हौशी वनस्पती निरीक्षकांचा सर्वात जास्त गोंधळ कुठं होत असेल तर तो वनस्पतींच्या शास्त्रीय नावांमध्ये. खरंतर वनस्पतींच्या रूढ, प्रादेशिक नावांमध्ये असलेल्या वैविध्यामुळे होणाऱ्या घोळा पेक्षा हा गोंधळ खूपच बरा. फेसबुक वरील एखाद्या वनस्पती विषयक ग्रुप मध्ये 'आयडी' विचारल्यावर किती गंमतशीर उत्तरं मिळतात!! त्यामुळे वनस्पतींची शास्त्रीय नावं कितीही क्लिष्ट असली तरी त्यातून मार्ग काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

वनस्पती शास्त्रज्ञांना सुद्धा ही नावं काही कमी छळतात असं नाही. जगभरातील शास्त्रज्ञांनी वर्षानुवर्षे वेगवेगळ्या प्रदेशात नोंदवलेली निरीक्षणं आणि आपापल्या अभ्यासातून वनस्पतींना दिलेली शास्त्रीय नावं, ते नाव प्रथम देणारा ऑथर, त्यांची समानार्थी नावं (synonyms), वापरात नसलेली नावं अशी सगळी (आणि इतर बरीच) काथ्याकूट करून वनस्पतीला अचूक आणि सर्वमान्य नाव देणे हेच शास्त्रज्ञांचे एक काम होऊन बसते.

आपल्या चर्चेच्या अनुषंगाने येणारा मुद्दा हा की या बाभळी आणि खैराच्या गटातील सर्व वनस्पतींनाही या शास्त्रीय नाव देण्याच्या आणि बदलण्याच्या दिव्यातून जावं लागलं आहे. आपल्याला समजण्यासाठी अतिसुलभीकरणाचा धोका पत्करून, जागतिक पातळीवरील शास्त्रज्ञांमध्ये झालेल्या या लढ्याविषयी आपण या भागात चर्चा करू.

आपल्या या बाभळी आणि खैराची, परदेशातून आलेली एक सावत्र बहीण भारतभर सर्वत्र पसरलेली आहे. बाभळीच्याच जातीची (genus - Acacia) पण काटे नसलेली ही प्रजाती म्हणजे, Acacia auriculiformis किंवा ऑस्ट्रेलियन बाभूळ. हळदी रंगाचे, भरपूर प्रमाणात येणारे या बाभळीचे फुलोरे, खैरासारखे catkin प्रकारचे असतात. खूप उंच आणि सरळ वाढणारी ही ऑस्ट्रेलियन बाभूळ पानांच्या बाबतीत खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारण वितभर दिसणारी ही पानं, खरी पानं नसून शास्त्रीय दृष्ट्या प्रकाश संश्लेषण करू शकणारं पानाचं फक्त देठ आहेत (phyllodes). बी अंकुरल्यानंतरची एक दोन पानच फक्त खरी पाने असून, त्याची रचना आपल्या बाभळीसारखीच असते. ही पाने लवकरच गळून जातात आणि त्यानंतर येतात ते फक्त हे phyllodes. या ऑस्ट्रेलियन बाभळीचे फोटो OneFlora.in वेबसाईटवर डॉक्युमेंट केलेले आहेत.

अनेक वर्षे, Acacia या जातीवाचक नावात (genus) "बाभळीचा गट", "खैराचा गट' आणि हा "ऑस्ट्रेलियन बाभळीचा गट" अशा तिन्ही गटाच्या मिळून साधारण १३०० प्रजातींचा समावेश होता. यात ऑस्ट्रेलियन बाभळीच्याच तब्बल ९६० प्रजाती होत्या.

आता आपल्याही सहज लक्षात येईल की, या तीनही गटांमध्ये फुलं जरी एकसारखी असली तरी इतर भरपूर फरक आहेत. या तीनही गटांना एकाच "अकेशिया" या जातीत टाकायची काही गरज नव्हती. ही झालेली चूक जेव्हा शास्त्रज्ञांच्या लक्षात आली, तेव्हा इतर कुठल्यातरी दोन गटांचे "नामांतर" करणं गरजेचं होतं. आता "नामांतर" करायच म्हणजे पुढे काय घडलं असेल याची कल्पना आपण महाराष्ट्रातले लोक सहज करू शकतो.

या बाभळीच्या आणि खैराच्या गटातील प्रजातींचे मूलस्थान व व्याप्ती साधारण आफ्रिका खंड, अरबस्तान आणि भारतीय द्वीपकल्पात आहे. "अकेशिया" या शब्दाचा मूळ अर्थच 'टोकदार काटे असलेला' असा आहे. आपल्याकडे अकेशिया हा शब्द प्रचलित नसला तरी आफ्रिका खंडामध्ये तेथील बाभळी सदृश्य झाडांसाठी अकेशिया हे नाव खूपच प्रचलित आहे. Flat top किंवा इंग्रजी "T" सारखं दिसणारं अकेशियाच झाड तेथील देशांमध्ये राष्ट्रीय चिन्ह मानल जातं. आपल्याकडील वड, पिंपळ, उंबर या झाडा इतकं महत्त्व तेथील देशांमध्ये या अकेशियाच आहे.

आता या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांच्या सभेमध्ये "ऑस्ट्रेलियन बाभळी" च्या गटाचं नाव Acacia असे कायम ठेवून "बाभळीचा गट" आणि "खैराचा गट" याला वेगळे नाव देण्याचा प्रस्ताव जेव्हा पुढे आला तेव्हा वादाला तोंड फुटणारच होते. वनस्पती शास्त्रातील नाव बदलण्याच्या पद्धतीतील जटिलता, वनस्पतींचे जनुकीय विश्लेषण, मोलिक्युलर पातळीवरील फरक याबरोबरच भावनिक ऋणानुबंध, सांस्कृतिक महत्त्व अशा बऱ्याच मुद्द्यांवर हा वाद आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दोन्हीकडच्या शास्त्रज्ञांकडून खूप हिरीरीनं अनेक वर्ष लढवला गेला.

२००३ मध्ये ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी आणलेला हा प्रस्ताव पुढे २०११ मध्ये मेलबर्न येथे झालेल्या इंटरनॅशनल बोटॅनिकल काँग्रेस मध्ये मंजूर झाला. "बाभळीच्या गटाला" Vachellia तर "खैराच्या गटाला" Senegalia हे नाव देण्यात आले आणि ऑस्ट्रेलियन यावेळीही मोक्याच्या वेळी चांगली खेळी करून फायनल मॅच जिंकले.

पाचव्या भागातील चित्र आता या नामांतराच्या चर्चेनंतर शास्त्रीय नावांमध्ये बदल करून दिलेले आहे. Https://OneFlora वेबसाईटवर सुद्धा ही बदललेली नावंच दिलेली आहेत.

या प्रकरणाविषयी सखोल माहिती घेण्यासाठी खालील लिंक चेक करा.

https://www.abc.net.au/news/science/2021-06-20/acacia-name-debate-botany-taxonomy-africa-australia-plants/100221938

आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि लेख आवडल्यास आपल्या ग्रुप मध्ये शेअर करा.

क्रमशः
-------------
आधीच्या भागांची लिंक
भाग १:
https://www.facebook.com/share/p/15vmgxVbxU/

भाग २: "देव"बाभूळ, हिवर, बाभूळ
https://www.facebook.com/share/p/15rBEp8RLs/

भाग ३: अजून तीन प्रकारच्या बाभळी
https://www.facebook.com/share/p/18X6haLo9u/

भाग ४: खैराचे तीन प्रकार
https://www.facebook.com/share/p/1AFD27P6ab/

भाग ५: शिकेकाई, शेंबरटी, चिल्हार
https://www.facebook.com/share/p/1AppvvBNji/

15/02/2025

"शमी" च्या शोधात - भाग ५, शिकेकाई, शेंबरटी, चिल्हार

मागच्या भागात आपण Acacia आणि Senegalia या दोन जातीतील फरक, त्यांच्या काट्यांमधील फरका वरून समजून घेतला. Acacia: लांब, टोकदार, इंग्रजी "V" आकार आणि Senegalia छोटे, त्रिकोणी, वक्राकार. Senegalia जातीच्या आपण पाहिलेल्या तीन प्रजातीत (पांढरा खैर, काताचा खैर, S. ferruginea) फुलोऱ्याची रचना ही catkin प्रकारची होती - वितभर लांब, दाटी वाटीने छोटी छोटी फुले लगडलेली, साधारण मांजराच्या शेपटी सारखी.

या भागात आपण Senegalia प्रजातीच्याच आणखी चार प्रजाती पाहणार आहोत. या सर्व प्रजातीत, काट्यांचा आकार 'खैरा' सारखा असला तरी फुलोऱ्याची रचना मात्र 'बाभळी' सारखी असते (छोटीशी गोंडेदार फुले). बाभळी किंवा खैराप्रमाणे, काटे फक्त पानाच्या बेचक्यात नसून, खोड, फांदी आणि पानाची मुख्य शिर असे सगळीकडे भरपूर प्रमाणात आढळतात.

या चारही प्रजाती वेल किंवा महावेल या प्रकारच्या असून त्या आजूबाजूच्या झाडा-झुडपांच्या आधारे, रानात चांगल्या लांब आणि उंच पसरू शकतात (straggler). या वेलांचे खोड काष्ठरूपी असले तरी झाडासारखे स्वतःचा भार पेलू शकणारे नसते. छोटे गोलाकार फुलोरे आपण 'हिवर' च्या वेळी बघितले तसे panicle प्रकारचे असतात.

यातील पहिली प्रजाती म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असणारी शिकेकाई (Senegalia rugata). तांबूस चॉकलेटी रंगाच्या, जाडसर आणि सुरकुतलेल्या शिकेकाईच्या शेंगा आपण बऱ्याच जणांनी बाजारात पाहिल्या असतील. पण मोकळ्या रानात, शेंगा नसताना हा शिकेकाईचा महावेल बाकी तीन प्रजातीतून वेगळा ओळखणे हे खूपच कठीण आहे.

वनस्पती निरीक्षणाच्या आपल्या या पहिल्या प्रयत्नात, आपण दुसऱ्या व तिसऱ्या भागात बघितलेला "बाभळीचा गट" चौथ्या भागात बघितलेला "खैराचा गट" आणि या भागात वर चर्चिलेला चार प्रजातींचा "महावेल गट", इतकी जरी वर्गवारी करू शकलो तरी पुष्कळ आहे. वरील चित्रात ही वर्गवारी त्यातील प्रजातीं सकट दिलेली आहे.

या महावेल गटातील बाकी तीन प्रजातीत शेंगा अगदी चपट्या, शिकेकाई पेक्षा खूपच वेगळ्या असतात. शिकेकाईचे फुलोरे फांदीच्या टोकाला raceme प्रकाराचे, तर बाकी तीन प्रजातींत ते panicle प्रकारचे असतात.

"कूक" च्या फ्लोरा मध्ये दिल्यानुसार Senegalia pennata (शेंबरटी) या प्रजातीत मुख्य शिरेच्या दोन्ही बाजूस, पर्णिकांच्या रांगा (pinna) साधारण १०-१२ असून, प्रत्येक रांगेत पर्णिकांच्या ४०-५० जोड्या असू शकतात.
बाकी Senegalia torta (चिल्हार) आणि Senegalia caesia या प्रजातीत पर्णिकांच्या रांगा (pinna) साधारण ५-१० असून, प्रत्येक रांगेत पर्णिकांच्या १०-३० जोड्या असू शकतात.

माझ्या निरीक्षणा नुसार Senegalia caesia चे फुलोरे पांढऱ्या/फिकट रंगाचे असून ते बाकी तीन प्रजातीं पेक्षा निराळे असतात. तज्ञांनी आणि निसर्ग अभ्यासकांनी यासंदर्भात आपली मते/निरीक्षणे नोंदवावी.

शिकेकाई सोडल्यास बाकी तीन प्रजातींची मी नोंदवलेली निरीक्षणे आपल्या वेबसाईटवर अगदी डिटेल मध्ये फोटोसकट दिलेली आहेत.

निसर्गातील इतकी विविधता आणि इतके बारकावे वनस्पती शास्त्रज्ञां पुरतेच मर्यादित न राहता सर्वसामान्यां पर्यंत पोहोचवण्यासाठीच OneFlora.in ही वेबसाईट बनवलेली आहे.

एक सांगायचं विसरलो,
खैराच्या गटातला आणखीन एक चौथा प्रकार मला राजस्थानला बघायला मिळाला. या प्रकारात खैरासारखे दोन काट्यांच्या ऐवजी प्रत्येक पानावर तीन काटे होते Senegalia senegal, अर्थातच ओळखायला खूप सोपा.

आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि लेख आवडल्यास आपल्या ग्रुप मध्ये शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू शकेल.

क्रमशः
-------------
आधीच्या भागांची लिंक
भाग १:
https://www.facebook.com/share/p/15vmgxVbxU/

भाग २: "देव"बाभूळ, हिवर, बाभूळ
https://www.facebook.com/share/p/15rBEp8RLs/

भाग ३: अजून तीन प्रकारच्या बाभळी
https://www.facebook.com/share/p/18X6haLo9u/

भाग ४: खैराचे तीन प्रकार
https://www.facebook.com/share/p/1AFD27P6ab/

12/02/2025

12 फेब्रुवारी, चार्ल्स डार्विन चा आज जन्मदिवस. यानिमित्ताने लोकसत्ता मध्ये आलेला हा उत्पल ब. वा. यांचा हा लेख.
सगळ्यांनी जरूर वाचा

10/02/2025

"शमी" च्या शोधात - भाग ४, खैराचे तीन प्रकार
(आधीचे भाग आपल्या OneFlora.in OneFlora.in या पेजवर वाचता येतील)

या लेखन मालेत, बाभळीच्या कुळातील (Mimosaceae) ज्या २५-३० झाडांची आपण ओळख करून घेणार आहोत त्यातली बरीचशी झाडं पावसाळ्याच्या महिन्यात बहरतात. फुलांवरून झाडाची अचूक ओळख करता येते (mostly).

मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे बाभळीच्या (Acacia) संयुक्त पानांची रचना आपल्या चांगलीच लक्षात आली असेल - अगदी छोट्या छोट्या पर्णिका दुहेरी जोडीने, मुख्य शिरेच्या दोन्ही बाजूस.

आता या पुढच्या प्रकारात पानं जरी बाभळीसारखीच असली तरी काटे मात्र छोटे, त्रिकोणी, वक्राकार, साधारण गुलाबासारखे दिसतात. फुलोरा (inflorescence) विथभर लांब, दाटी वाटीने छोटी छोटी फुलं लगडलेला, मांजराच्या शेपटी सारखा (catkin) असतो.

अशा सर्व रचना, एकाच झाडावर दिसल्या तर ते झाड Mimosaceae वर्गातील Senegalia, म्हणजेच 'खैर' च्या जातीचे आहे असे म्हणता येईल. Acacia आणि Senegalia या दोन जातीतील फरक वरच्या चित्रात स्पष्ट केलेला आहे. आता या खैराचे तीन प्रकार अजून बारकाईने समजून घेऊ.

पहिल्या प्रकारच्या खैराचं खोड हे पिवळट पांढरं, पापुद्र्या सारखे सुटलेले असतं. खोडावर अर्धगोलाकार बुडाचे काटे (persistent spines) अगदी स्पष्ट दिसतात. अनेक वर्ष वाढ होत राहिल्याने त्यांचा असा आकार होत असावा. हा 'पांढरा खैर', शास्त्रीय भाषेत Senegalia polycantha.
याचा फुलायचा काळ पावसाळ्याच्या थोडा आधीचा असतो. पुण्याजवळील पाबेघाट परिसरात आख्खं माळरान, या पांढऱ्या खैराच्या, क्रीम कलरच्या तुर्‍यांनी भरलेलं मी पाहिलं आहे.

बाकी दोन प्रकारत खोड करडं/काळं आणि भेगाळलेलं असतं, पण पानाच्या रचनेत थोडा फरक असतो. मुख्य शिरेच्या दोन्ही बाजूस, पर्णिकांच्या रांगा (pinna) साधारण १५ पेक्षा जास्त आणि जवळ-जवळ आढळल्यास, ते झाड म्हणजे, "कात-चुन्या" संदर्भात ओळखला जाणारा काताचा खैर, Senegalia catachu. पर्णिकांच्या रांगा (pinna) ६ पेक्षा कमी आणि सुटसुटीत आढळल्यास, ते झाड Senegalia ferruginea.

पानांची रचना पांढरा खैर आणि काताचा खैर यात जवळपास सारखीच असते. पण बरकाईनी पाहिलं की एक महत्वाचा फरक दिसतो. पांढरा खैर ला मुख्य शिरेच्या खाली छोटे काटे असतात. काताच्या खैर ला मुख्य शिरेच्या वर, सुरुवातीला आणि टोकाला पर्णरंध्र (lenticells) असतात. OneFlora.in वेबसाईटवर ही सर्व निरीक्षण फोटोमध्ये अगदी स्पष्टपणे दिसतील.

https://oneflora.in/search_flora?search_word=Nilotica+%7C+farnesiana+%7C+leucophloea+%7C+catechu+%7C+polyacantha+%7C+ferruginea

आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि लेख आवडल्यास आपल्या ग्रुप मध्ये शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू शकेल.

क्रमशः
--------------
आधीच्या भागांची लिंक
भाग १:
https://www.facebook.com/share/p/15vmgxVbxU/

भाग २: "देव"बाभूळ, हिवर, बाभूळ
https://www.facebook.com/share/p/15rBEp8RLs/

भाग ३: अजून तीन प्रकारच्या बाभळी
https://www.facebook.com/share/p/18X6haLo9u/

--------------
पुढच्या भागांची लिंक

भाग ४: खैराचे तीन प्रकार
https://www.facebook.com/share/p/1AFD27P6ab/

भाग ५: शिकेकाई, शेंबरटी, चिल्हार
https://www.facebook.com/share/p/1AppvvBNji/

01/02/2025

"शमी" च्या शोधात - भाग ३ अजून तीन प्रकारच्या बाभळी
(आधीचे भाग आपल्या OneFlora.in या पेजवर वाचता येतील)

वनस्पतींचा अभ्यास करताना, एकेका वनस्पतीची माहिती जमवून, एकेका वनस्पतीचे निरीक्षण करून, त्याची एकेकटी ओळख करून घेणं हे जवळपास अशक्य आहे. कुठल्याही प्रदेशात वनस्पतीच्या एकाच कुळातील अनेक जाती आणि प्रजाती एकत्रित आढळतात. एकाच कुळातील या वनस्पतीत बरेचसे साम्य आणि अगदी कमी फरक आढळतो. त्यामुळे या सर्व वनस्पतींचा एकत्रित अभ्यास करणं सोयीचं आणि शास्त्रशुद्ध आहे. हीच पद्धत पक्षी, फुलपाखरे, कीटक किंवा इतर कुठल्याही सजीवाच्या अभ्यासासाठी वापरली जाते.

वनस्पतीशास्त्रा वरील अनेक पुस्तकांमध्ये, अगदी संदर्भ ग्रंथांमध्ये सुद्धा झाडांची माहिती अगदी स्वतंत्रपणे दिलेली असते. या पद्धतीने केलेली पुस्तकाची मांडणी आपल्यासारख्या नवशिक्यांना थोडी जिकिरीची होते, आणि बरीच झाडे ओळखण्यात अकारण कन्फ्युजन होतं. या लेखन मालिकेत आपण या सर्व सारख्या दिसणाऱ्या झाडांची, त्यांच्यातील साम्य आणि फरक समजून घेत, एकत्रितपणे ओळख करून घेणार आहोत.

मागील भागात आपण बाभूळ, देवबाभूळ आणि हिवर यांची ओळख करून घेतल्यावर सुद्धा हे बाभूळ प्रकरण अजून संपलेले नाही.

मागील वर्षी राजस्थानात गेलो असता तिथे मला अजून दोन प्रकारच्या बाभळी दिसल्या. बाकी सर्व रचना आपल्याकडच्या बाभळी सारखीच असली, तरी या दोन्ही प्रजातीच्या शेंगा एखाद्या स्प्रिंग सारख्या गोलाकार होत्या. फुलोरा क्रीम कलरचा आणि झाडाचा आकृतीबंध इंग्रजी अक्षर "T" सारखा flat top होता. साधारण याच सारखी झाडं तुम्ही डिस्कव्हरी चॅनलवर, दक्षिण आफ्रिकेतील 'सवाना' किंवा 'सरंगेटी' प्रदेशा संबंधित एखाद्या डॉक्युमेंटरीत बघितली असतील. Acacia planiforns आणि Acacia tortilis (इजराइल बाभूळ) या त्या दोन प्रजाती.

अजून एका प्रकारची बाभळी मला आमच्या सासुरवाडीला, हैदराबादच्या 'के बी आर' गार्डनमध्ये सापडली.
(हैदराबाद शहराच्या अगदी मध्यात असलेल्या या 'के बी आर' गार्डन विषयी आणि तेथील जैवविविधतेविषयी एक व्हिडिओ बनवण्याचं काम सध्या चालू आहे तो काही दिवसात शेअर करीनच)

हैदराबाद मधील या बाभळीची पानं, म्हणजे सर्व पर्णिकां सहित अख्ख पान, अगदी लहान म्हणजे बोटाच्या एका पेरावर मावेल इतकं छोटं होतं. बागेत दिलेल्या माहितीनुसार हे Acacia eburnea.

वर उल्लेखलेल्या तिन्ही प्रजातींच्या रचने विषयी आणि त्याच्या अचूक ओळखी विषयी माझ्या मनात अजून काही शंका आहेत. पुण्यात मला या तिन्ही प्रजाती दिसलेल्या नाहीत. तज्ञांनी आणि निसर्ग अभ्यासकांनी यासंदर्भात आपली मते/निरीक्षणे नोंदवावी.

या तीनही प्रजातींची मी नोंदवलेली निरीक्षणे आपल्या वेबसाईटवर अगदी डिटेल मध्ये फोटोसकट दिलेली आहेत.

https://oneflora.in/search_flora?search_word=Vachellia+

बाभूळ प्रकरण आता आपण इथे थांबवू. प्रजातींचा एकत्रित अभ्यास करण्याच्या आपल्या या पद्धतीत पुढील प्रजातींची ओळख करून घेताना बाभळी किंवा हिवरचा उल्लेख हा वारचेवर येणारच आहे.

पुन्हा भेटू...

--------------
आधीच्या भागांची लिंक
भाग १:
https://www.facebook.com/share/p/15vmgxVbxU/

भाग २:
https://www.facebook.com/share/p/15rBEp8RLs/

29/01/2025

"शमी" च्या शोधात - भाग २: "देव"बाभूळ, हिवर, बाभूळ
(आधीचा भाग आपल्या OneFlora.in या पेजवर वाचता येईल)

एकदा का तुम्ही डोळसपणे वनस्पतींचे निरीक्षण करायचं मनावर घेतलंत की तुम्हाला तुमच्या परिसरात वड, पिंपळ, आंबा, नारळ याशिवायही इतर बरीच झाडे आहेत हे सहज लक्षात येतं. रस्त्यावरुन फिरताना, एखाद्या बागेत किंवा डोंगर-टेकडीवर, पिवळ्या रंगाची (हळदी) गोंडेदार फुलं एखाद्या उंच झाडावर किंवा रस्त्यावर सडा पडलेली दिसली तर त्यांचं थोडावेळ नक्की निरीक्षण करा.

हि छोटीशी गोंडेदार फुलं, शास्त्रीय भाषेत फुलं नसून, अनेक फुलांनी बनलेले पुष्पगुच्छ (inflorescence) आहेत. आता त्याच झाडाच्या एखाद्या हाताला येणाऱ्या फांदीवर काटे आहेत का बघा. चांगले एखाद इंच लांब, टोकदार, इंग्रजी "V" आकारात, पांढरट काटे प्रत्येक पानावर दिसून येतात. मी पहिल्या भागात सांगितल्या प्रमाणे पाने ही संयुक्त प्रकारची - अगदी छोट्या छोट्या पर्णिका दुहेरी जोडीने, मुख्य शिरेच्या दोन्ही बाजूस अगदी दाटीवाटीने रचलेली - चित्रात दाखवल्याप्रमाणे आहेत हे तपासून घ्या.

पहिल्याच निरीक्षणात या सर्व रचना दिसतील असं नाही. सर्वच पिवळी फुलं गोंडेदार असतील असेही नाही. वेगवेगळी निरीक्षणे नोंदवून ठेवा, फोटो काढून ठेवा. झाडांच्या बुंध्याची रचना बघा. झाडावर शेंगा आल्यात का बघा. प्रत्येक झाडाचे असे सर्व भाग बघितल्यावरंच त्याची खरी ओळख करता येते. एकाच वेळी हे सर्व भाग दिसतील असेही नाही. शब्दकोडे सोडवताना पेपरात सर्व क्ल्यू आधीच दिलेले असतात, गणिताचे कोडे सोडवताना लागणारी माहिती आधीच दिली जाते, पण निसर्गातील हे वनस्पतींचे कोडे सोडवताना लागणारी माहिती आपल्यालाच वारंवार, अनेक निरीक्षणातून जमा करावी लागते. निसर्ग निरीक्षणाची खरी गंमत तर हे सर्व क्ल्यू स्वतः शोधण्यातच आहे, 'एक्सपर्ट' कडून झाडाचे आयते नाव जाणून घेण्यात अजिबात नाही.

आता या सर्व रचना, एकाच झाडावर दिसल्या तर ते झाड Mimosaceae वर्गातील Acacia (म्हणजेच आपल्या बाभळीच्या) या जातीचे आहे असं म्हणता येईल.
आता एक पाऊल अजून पुढे जायचे आहे...

आता शेंगेच निरीक्षण करताना, जराश्या फुगीर, साधारण बोटाएवढ्या, आणि कडेवर पांढरी रेघ असलेल्या शेंगा दिसल्यास हे झाड नक्की देव बाभळीचे समजावे (Acacia farnesiana). मध्यम उंचीचे हे छोटे झाड त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शेंगेमुळे अगदी अचूक ओळखता येते.

वर आपण बाभळीच्या पिवळ्या, गोल फुलोऱ्याबद्दल बोललो होतो. या फुलोऱ्याची फांदीवरील रचना अजून बारकाईने तपासली तर आपल्याला दोन प्रकारच्या रचना दिसून येतात. चित्रात दाखविल्याप्रमाणे, फांदीच्या टोकाला मुख्य अक्षालगत (raceme) किंवा फांदीच्या टोकाला मुख्य अक्षाच्या उपफांदिच्या लगत (panicle).

हे raceme प्रकारचे झाड म्हणजे 'बाभूळ' (Acacia nilotica) आणि panicle प्रकारचे झाड म्हणजे 'हिवर' (Acacia leucophloea). देव बाभळीत हेच फुलोरे ३-४ च्या संख्येने एकाच जागी असतात.

हिवर चे झाड मध्यम उंचीचे असून खोडाचा रंग साधारण करडा किंवा फिका असतो. बाभळीचे झाड चांगलेच उंच वाढते, खोड गडद काळ्या रंगाचे आणि खडबडीत असते.

हिवर च्या चपट्या, लवयुक्त शेंगांचे घोस झाडावर लागडलेले दिसतात. बाभळीच्या शेंगा चित्रात दाखवल्याप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण आकाराच्या असतात.

एकदा का या हिवरच्या पानांचा रंग डोळ्यात बसला, त्याचा आकृतीबंध नीट कळला की अगदी दुरून, चालत्या गाडीतून, फुले नसताना सुद्धा हा हिवर चटकन ओळखता येतो.

या भागात आपण Mimosaceae वर्गातील, Acacia जातीतील, तीन झाडांची माहिती घेतली. या तीनही झाडांचे भरपूर फोटो आणि अजून माहिती आपल्या https://OneFlora.in वेबसाईटवर दिलेली आहेत.

https://oneflora.in/search_flora?search_word=Nilotica+%7C+farnesiana+%7C+leucophloea

आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि लेख आवडल्यास आपल्या ग्रुप मध्ये शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू शकेल.

क्रमशः

--------
आधीच्या भागाची लिंक
भाग एक: https://www.facebook.com/share/p/1BKFR55uXE/

-------
पुढच्या भागाची लिंक
भाग तीन:
https://www.facebook.com/share/p/1GbPWGi35j/

25/01/2025

"शमी" च्या शोधात - भाग १
(पुढील भाग याच पेजवर क्रमशः प्रसिद्ध करणार आहोत. लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद)

२०१८ मध्ये पुण्याच्या आघारकर संस्थेतून वनस्पती अभ्यासावरील कोर्स पूर्ण केल्यावर एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळालं. वनस्पती विश्व, जे कायमच आपल्या आजूबाजूला होतं, त्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला. डोंगरावर पसरलेल्या हिरव्यागार पट्ट्यात झाडांची इतकी गुपितं दडलेली आहेत याची कल्पनाच नव्हती.

कोर्स संपताच विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप बनतात. महिन्यातल्या एखाद्या रविवारी आजूबाजूच्या डोंगरावर किंवा शहरातील बागांमध्ये "ट्री वॉक" चे आयोजन केले जाते. एखादा वनस्पती शास्त्रज्ञ मिळाला तर ठीक, नाहीतर वासरातल्याच एखाद्या गाईला एक्सपर्ट बनवून वनस्पती निरीक्षण सुरू होते. इथेच या कोर्सेची खरी मजा सुरू होणार असते.

पुण्याच्या आजूबाजूच्या डोंगर परिसरात हिंडताना सर्वप्रथम नजरेस पडते ती, खुरट्या झाडाझुडपांच्या स्वरूपात वाढणारी बाभळीची झाडी. महाराष्ट्रात राहणाऱ्या आपल्या सर्वांनाच बाभळीचे झाड (खरे तर त्याचे फक्त नाव) चांगलेच परिचयाचे असते. बाभळीचे काटे कधीतरी पायात बोचलेले असतात, कुठेतरी कथा-कविता वाचताना बाभळीचा उल्लेख आलेला असतो किंवा बबूल टूथपेस्ट वापरताना या बाभळीचा दातांची काहीतरी संबंध असावा असा विचारही मनात आलेला असतो. कोर्सच्या वर्गात, ही आपली बाभळी, Mimosaceae या वनस्पतींच्या एका वर्गात मोडते ही एक नवीन माहिती मिळते. या वर्गातील सर्व झाडांना शेंगेसारखी फळे येतात. पिकल्यावर या शेंगा दोन भागात उकलतात आणि चपट्या कठीण बिया बाहेर पडतात. पाने संयुक्त प्रकारची असून, अगदी छोट्या छोट्या पर्णिका दुहेरी जोडीने, मुख्य शिरेच्या दोन्ही बाजूस अगदी दाटीवाटीने रचलेल्या असतात.

अशी ही सर्व माहिती घेऊन प्रत्यक्ष निसर्गदर्शन सुरू होते, आणि चमूतील कोणालातरी या बाभळीचे दर्शन होते. झाडाचे नाव सांगितल्याचा आनंद त्याच्या तोंडावर स्पष्ट दिसत असतो. पण तेवढ्यात कोणीतरी म्हणत की हा तर खैर आहे. अजून कोणाला तरी तो 'हिवर' वाटत असतो. 'गुलाबी बाभूळ', 'पांढरा खैर', 'चिल्हार' हे ही शब्द ऐकू येतात. एक्सपर्ट सुद्धा आपल्याच धुंदीत काही बाही निरीक्षण करत असतो, तेवढ्यात बाजूच्या काकू साक्षात्कार झाल्याच्या आविर्भावात म्हणतात "अहो हा तर मला शमी वाटतोय". शमीचे नाव ऐकताच सर्वांच्यात एकच उत्साह संचारतो आणि सगळे एक्सपोर्टचे मत ऐकण्यास अतुर होतात.

या शमीची भारतीय जनमानसावर असलेली भुरळ मला कायमच अचंबित करते. झाडाझुडपांची थोडीफार ओळख झाली की लोकांना हा शमी हवा असतो. गणेशपत्रीतील शमीचे महत्त्व वादातीतच आहे. सच्चा निसर्गप्रेमीलाही हा शमी, म्हणजेच राजस्थानातील 'खेजडी', निसर्गासाठी काहीतरी करायची प्रेरणा देत असतो. मागणी जास्त असल्यामुळे नर्सरी वाले सुद्धा शमीचे म्हणून कुठलीही झाडे विकतात. फेसबुक वरील वनस्पती विषयक ग्रुप मध्ये शमीवर जितकी चर्चा होते तितकी दुसऱ्या कुठल्या झाडावर होत नसावी.

वर उल्लेखलेली सर्वच झाडे Mimosaceae या एकाच वर्गातील असल्यामुळे साधारण एकसारखीच दिसतात. पुण्यात, अख्ख्या महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतभर, या बाभळी वर्गातील किमान २५-३० झाडे सहज दिसून येतात. या सर्वा झाडांमधून शमीला वेगळं ओळखणं अर्थातच सोपं नाही. यातील प्रत्येक झाडाची ओळख करून घेत क्रमशः आपण शमीपर्यंत पोचणार आहोत. चला तर मग....
क्रमशः..

----------
पुढच्या भागाची लिंक
"शमी" च्या शोधात - भाग २: "देव"बाभूळ, हिवर, बाभूळ
https://www.facebook.com/share/p/1BSB4F98xk/

"शमी" च्या शोधात - भाग ३: अजून तीन प्रकारच्या बाभळी
https://www.facebook.com/share/p/1GbPWGi35j/

13/09/2024

झाडाचं नाव ओळखायचं तरी कसं? स्वतःहून....

सध्या या गणपतीच्या दिवसात अख्खं हैदराबाद शहर सप्तपर्णीच्या सुगंधाने भरून गेलं आहे. आजच सकाळी इथल्या 'इंदिरा पार्क' मध्ये फेरफटका मारताना दुरून एका झाडावर गुच्छात लगडलेल्या, लांबुळक्या-बारीक सप्तपर्णी सारख्या शेंगा दिसल्या. सप्तपर्णीला इतक्यात शेंगा कशा काय लागल्या? अशा विचारात असतानाच, त्या झाडाचं पांढरं खोड दिसलं.

थोडं नीट बघितल्यावर उंचावर छोटी फुलं दिसली. अनोळखी झाडावर जेव्हा फुलं दिसतात, तेव्हा जाम आनंद होतो... कारण आता त्या झाडाचं नाव शोधण्याचा महत्त्वाचा clue मिळालेला असतो.

पानं आणि फुलं खूप उंचावर होती. त्यामुळे नीट फोटो काढता आले नाहीत. पानं सप्तपर्णी सारखी नक्कीच नव्हती त्यावरून हे झाड सप्तपर्णीच नाही याची खात्री झाली.
झाडाखाली अगदी छोटी, पाच पाकळ्यांची पांढरी फुलं पडलेली दिसली. ती फुलं याच झाडाची आहेत याची खात्री करून त्यांचे फोटो घेतले.

वाळून खाली पडलेली पानं चांगली रुंद आणि लांब, plumeria (firangipani) सारखी होती. फुलं सुद्धा plumeria च्या फुलांसारखी पण अगदी छोटी. झाडावरची पानं नीट दिसत नसली तरी ती simple leaves आहेत हे कळत होतं.

"गुगल लेन्सला झाड ओळखता येत नाहीत" या माझ्या मताची खात्री करून घेण्यासाठी गुगल लेन्सला विचारून बघितलं. अर्थातच योग्य उत्तर मिळालं नाही आणि मग मी माझा नेहमीचा, "झाडाचं नाव शोधण्याचा" उद्योग सुरू केला.. तो कसा? तर असा...

सप्तपर्णी सारख्या शेंगा आणि plumeria सारखी पानं व फुलं या माहितीवर हे नवीन झाडं त्याच बोटॅनिकल फॅमिलीच, म्हणजे Apocynaceae फॅमिलीच असावं असा अंदाज करून, Flowers of India च्या वेबसाईटवर, टेक्स्ट सर्च मध्ये "Apocynaceae" सर्च केलं.
Apocynaceae ची तब्बल २१४ झाडं मिळाली. अजून फिल्टर करण्यासाठी "Apocynaceae white" असा सर्च करून बघितला तर १०४ झाडं आली. "Apocynacea tree" असा सर्च केल्यावर मात्र तीन पानांमध्ये ४५ झाड मिळाली. पहिल्याच पानावर "Alstonia microphylla, मोठी सातवीण" या नावाखाली, मी बघितलेल्या फुलांसारखा फोटो दिसला. इतर झाडांचे फोटो मॅच झाले नाहीत.

Flowers of India च्या वेबसाईटवर खूप कमी फोटो असतात. या मोठ्या सातवीणीचा तर एकच फोटो होता. अजुन शोध घेण्यासाठी आता eflora india च्या वेबसाईटवर Alstonia microphylla असा सर्च केला, आणि बिंगो...
तसंच पांढऱ्या रंगाचं खोड, तशीच नाजूक छोटी पांढरी फुलं, plumeria सारखी पानं आणि सातविणीसारख्या शेंगा सगळे clues एकदम perfect match झाले. "मोठी सातवीण" (Alstonia microphylla) हे नाव आता कन्फर्म झालं.

अजून माहिती शोधल्यावर ज्या गोष्टी प्रत्यक्ष झाडावर नीट दिसल्या नव्हत्या त्याही लक्षात आल्या. सप्तपर्णी मध्ये साधारण पाच ते सात पानं, फांदी भोवती गोलाकार arrangement मध्ये असतात. तर या मोठ्या सप्तपर्णीत फक्त "तीन" च पानं गोलाकार रचनेत आढळतात.
या सप्तपर्णीला "मोठी' का म्हणत असावेत असा प्रश्न पडला. आपल्या नेहमीच्या सप्तपर्णीची प्रचंड उंच झाडं मी बऱ्याच ठिकाणी बघितली आहेत त्यामुळे "मोठी" हे विशेषण उंचीसाठी नसावं. आपल्या नेहमीच्या सप्तपर्णीपेक्षा हीची पानं नक्कीच मोठी - लांब आणि रुंद - होती. त्यामुळे "मोठी" हे विशेषण पानांसाठी असावं हा अंदाज जास्त लॉजिकल वाटला.

एखाद्या झाडाचं नाव शोधण्यासाठी काय उद्योग करावा लागतो याची काहीशी कल्पना आपल्याला आली असेल.
ही पद्धत अर्थातच क्लिष्ट आहे आणि यासाठी भरपूर सराव आणि patience आवश्यक आहे. झाडाचं नाव स्वतः शोधायचं असेल तर कष्ट आणि वेळ लागणारच. तुम्हीही प्रयत्न करून बघा, नक्की जमेल...

eflora india आणि flowers of India या दोन वेबसाईटचा, मी कायम ऋणी राहीन. या वेबसाईट जर नसत्या तर मला नाही वाटत की मला कधी झाडं ओळखता आली असती....
या दोन्ही वेबसाईट मध्ये अर्थातच खूप त्रुटी आहेत. माहिती खूप चांगली असली तरी दोन्ही वेबसाईट्स टेक्नॉलॉजी च्या बाबतीत खूपच आऊट डेटेड आणि सर्वसामान्यांना वापरण्यासाठी थोड्या अवघड आहेत.

लेटेस्ट टेक्नॉलॉजी चा उपयोग करून सर्वसामान्यांना मोबाईलवर आजूबाजूची झाडं-फुलं सहज ओळखता यावी हा उद्देशाने OneFlora.in ही वेबसाईट आपण बनवली आहे. OneFlora.in वर माहितीची कमतरता आहे आणि ती भरून काढण्यासाठीचे प्रयत्न कायम चालू राहतील. धन्यवाद.

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Pune
411030